पेट्रोल पंपावर रक्तरंजित खेळ, मॅनेजरची हत्या तर हॉटेल कर्मचाऱ्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

नगरमधील रोजच्या हत्यासत्राने नागरिक भयभीत झाले आहेत. भररस्त्यात दिवसाढवळ्याही गुन्हेगार गुन्हा करताना घाबरत नाहीत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पेट्रोल पंपावर रक्तरंजित खेळ, मॅनेजरची हत्या तर हॉटेल कर्मचाऱ्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
किरकोळ वादातून पेट्रोलपंप मॅनेजरची हत्या
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 30, 2023 | 10:00 AM

अहमदनगर : जिल्ह्यात हत्येचं सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. रोज काही ना काही कारणातून हत्येच्या घटना घडत आहेत. क्षुल्लक कारणातून गुन्हेगार निष्पाप लोकांचाही जीव घेत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशीच एक आज पुन्हा उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात पेट्रोल पंपाच्या मॅनेजरची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. भोजराज घनघाव असे मयत मॅनेजरचे नाव आहे. या हल्ल्यात अन्य एक जण जखमी झाला आहे. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध सुरु आहे.

कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबाबत जाब विचारल्याने हत्या

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात नागपूर मुंबई महामार्गावर गुरुराज एचपी नावाचा पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपावर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तीन जण दुचाकीवरुन आले. या तिघांची पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. यावेळी एका आरोपीने एका कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली. यामुळे मॅनेजर घनघाव यांनी आरोपीला जाब विचारला. याच रागातून आरोपींनी चाकू काढला आणि मॅनेजरला भोसकले. यानंतर आरोपींनी पळ काढला. सर्व घटना पेट्रोलपंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु

कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेत मॅनेजरला शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना घोषित केले. याप्रकरणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी अमोल धोंडीराम मोहिते यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मोहिते यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले करीत आहे.