या तारखेला येणार भोंदू खरातवरील चित्रपट, सिनेमा काढण्याचं कारण आलं समोर, दिपाली सय्यद जिद्दीला पेटल्या
Maharashtra Epstein Files : खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आगामी काळात चित्रपट येणार आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री दिपाली सय्यद या खरातवरील चित्रपटात भूमिका साकारणार आहेत.

गेल्या काही काळापासून भोंदू खरातच्या काळ्या कारनाम्यांची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे, तसेच त्यांने भोंदूगिरी करून आणि आर्थिक गैरव्यव्हार करून अमाप संपत्ती कमावल्याचे समोर आले आहे. सध्या खरातची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. अशातच आता खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आगामी काळात चित्रपट येणार आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री दिपाली सय्यद या खरातवरील चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. अशातच आता हा चित्रपट कधी येणार? हा चित्रपट काढण्यामागील कारण काय आहे यावर आता सय्यद यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाल्या दिपाली सय्यद
दिपाली सय्यद यांनी भोंदू खरातवरील चित्रपटात काम करण्यावर बोलताना म्हटले की, अशोक खरातच्या कारनाम्यावर चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना धमक्या आल्यामुळे मोठ्या जिद्दीने चित्रपट काढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या तिघांची ही भेट घेऊन फोनवरुन धमकी आलेली माहिती देणार आहे. धमकी आल्यामुळेच मी जिद्दीला पेटले आणि चित्रपटात भूमिका साकारत आहे. 2 ऑक्टोबरला हा चित्रपट महाराष्ट्राच्या भेटीला येणार असून जूनमध्ये चित्रीकरण होणार आहे असंही सय्यद यांनी सांगितले आहे.
चित्रपटाविषयी सय्यद काय म्हणाल्या होत्या?
दिपाली सय्यद यांनी या चित्रपटाविषयी बोलताना म्हटले होते की, भोंदूबाबा अशोक खरातची मला कल्पनाच नव्हती. बाहेर आल्यानंतर (बिग बॉसच्या घरातून) कळलं की असा एक भोंदूबाबा आला आणि त्याने पूर्ण हलवून टाकलं सगळीकडे. पण चित्रपट मी काढत नाहीये हा चित्रपट दुसरं कोणी काढतंय. प्रोड्युसर मी नाहीये. पण मी कलाकार म्हणून त्या चित्रपटात दिसणार आहे. लवकरच मी तुमच्यासमोर येणार आहे.
इम्रान हाश्मी साकारणार भोंदू अशोक खरातची भूमिका ?
महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स असं नाव असणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन स्वरुप सावंत करणार आहेत. भोंदू खरातच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात अनेक कलाकार दिसणार असून कॅप्टन खरातची भूमिका कोण साकारणार, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र एपस्टिन फाईल चित्रपटामधील अशोक खरातच्या भूमिकेसाठी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मीच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर आली आहे.
