गुरूदेवांसमोर थिरकताना आनंद…; बंगळुरूमधील श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमात प्राजक्ताची फक्कड लावणी

श्री श्री रवीशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या आश्रमात प्राजक्ताने चक्क लावणी सादर केली आहे. गुरुदेवांसमोर लावणी सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त करत एक खास पोस्टही शेअर केली आहे.

गुरूदेवांसमोर थिरकताना आनंद...; बंगळुरूमधील श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमात प्राजक्ताची फक्कड लावणी
| Updated on: Jan 28, 2025 | 2:20 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळी केल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेचा विषय ठरतेय. सुरुवात तिच्या ‘फुलवंती’ या चित्रपटापासून झाली. फुलवंतीमधील तिचा अभिनय आणि तिचे नृत्य यामुळे तिला भलतीच पसंती मिळाली. त्यानंतर तिच्यावर केल्या गेलेल्या काही वक्तव्यांवरून तिने पत्रकार परिषद घेतली त्यावरूनही तिची चर्चा चांगलीच रंगली, तिला काहींनी ट्रोलही केलं. प्राजक्ता या ना त्या कारणाने चर्चेत मात्र राहिली.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमात प्राजक्ताची लावणी

प्राजक्ता माळी अजून एका विषयासाठी नेहमी चर्चेत राहते ते म्हणजे तिचं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ वर असलेलं प्रेम आणि विश्वास. ती अनेकदा तिच्या आश्रमातील तिच्या सेवेबद्दल सांगताना दिसते. प्राजक्ता ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडली गेली आहे. या संस्थेच्या बंगळुरू याठिकाणी असणाऱ्या आश्रमातून ती विविध पोस्ट शेअर करते.

एवढच नाही तर, AOL चे अनेक कोर्सही तिने केले आहेत. या आश्रमातील अनुभव, योगाभ्यास, ध्यानधारणा, श्री श्री रवीशंकर यांच्याप्रति असणारी तिची श्रद्धा आणि आदर हे सर्वांनाच माहित आहे.

आता पुन्हा एकदा प्राजक्ताने या आश्रमाबद्दल पोस्ट केलं आहे. पण यावेळी तिने जी पोस्ट केली आहे ते पाहून नक्कीच सर्वांना आश्चर्य वाटेल. कारण प्राजक्ता नेहमी ज्या आश्रमातील श्रद्धा, सकारात्मकता, प्रवचन, तिथल्या सहज-सरळ जगण्याबद्दलचे भरभरून वर्ण करायची त्याच आश्रमात तिने चक्क लावणी सादर केली. तेही तिच्या गुरुंसमोर.

आश्रमात विशेष कार्यक्रमात प्राजक्ताचे सादरीकरण

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्राजक्ताने लावणी सादर केली. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या बंगळुरुयेथील आश्रमात ‘भाव 2025’ या भव्य सांस्कृतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 23 ते 26 जानेवारीदरम्यानच्या या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं.

परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालणारा हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये होता आणि त्यात प्राजक्ताने तिची कला सादर केली. या कार्यक्रमात 70 हून अधिक सादरीकरणे झाली, तर शेकडो मान्यवर आणि कलाकार यावेळी उपस्थित होते.

फुलवंतीमधील ‘मदनमंजिरी’ या गाण्यावर लावणी सादर

प्राजक्ताने लावणी कला सादर करतानाचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने तिच्या फुलवंती या चित्रपटातील ‘मदनमंजिरी’ या गाण्यावर लावणी सादर केली. तिने ही पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या बॅंगलोर आश्रमामध्ये, तेही गुरूदेवांसमोर लावणी नृत्य सादर करेन असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि याचा अत्यंत आनंद झाला की जवळपास सर्व ‘पद्म पुरस्कार विजेत्या’ कलाकारांच्या मांदियाळीत भरतनाट्यम्, कथक, कुचिपूडी, कथकली, हिंदुस्तानी- कर्नाटक संगीताच्या थोडक्यात शास्त्रीय- उपशास्त्रीय नृत्य संगीताच्या मेळाव्यात ‘लावणीला आणि त्यायोगे मला’ जागा मिळाली.’

तसंच तिने तिला मिळालेल्या या संधीबद्दल आनंद व्यक्त करत पुढे लिहिले की, ‘सर्वस्वी श्रेय श्रीविद्या वर्चस्वी यांना जातं. गुरूदेवांसमोर थिरकताना मला किती आनंद झाला; हे फोटोतल्या हास्यावरून कळतच असेल.’ प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. तसेच तिचं कौतुकही केलं आहे.