MLC Election : पेन कोणता वापरायचा? पसंतीक्रम कसा द्यायचा? मत कधी बाद ठरणार? विधानपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे नियम एकदा वाचा
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. मत बाद होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने जारी केलेले कडक नियम आणि पेनचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती वाचा.

राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या १८ जूनला महाराष्ट्रातील १७ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मतदान ईव्हीएम (EVM) मशीनवर होणार नसून मतपत्रिकेद्वारे (Ballot Paper) होणार आहे. मतदान प्रक्रियेत कोणतीही गल्लत होऊ नये आणि मतदारांचे मत वाया जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने अत्यंत स्पष्ट आणि कडक नियमावली जारी केली आहे.
लोकप्रतिनिधींनी नेमके मतदान कसे करावे आणि कोणत्या चुकांमुळे मत अवैध ठरू शकते, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.
पसंतीक्रम कसा नोंदवायचा?
या निवडणुकीत मतदाराला पक्षाला किंवा थेट उमेदवाराला मतदान न करता पसंतीक्रम (Preferential Voting) द्यायचा असतो.
एकच मतपत्रिका: प्रत्येक मतदाराला एक मतपत्रिका मिळेल, ज्यावर निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांची नावे असतील.
पहिली पसंती अनिवार्य: आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात ‘१’ हा आकडा लिहिणे अत्यंत बंधनकारक आहे.
इतर उमेदवारांना मत: रिंगणात जेवढे उमेदवार आहेत, त्या सर्वांना पसंतीक्रम देण्याचा अधिकार मतदाराला आहे. एकापेक्षा जास्त उमेदवारांना मत द्यायचे असल्यास आवडीनुसार २, ३, ४ असा पसंतीक्रम लिहिता येईल.
कोणत्या चुकांमुळे मत ठरेल अवैध?
मतपत्रिकेवरील मत बाद होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही खालील गोष्टी केला तर मतदाराचे मत थेट कचऱ्याच्या पेटीत जाईल.
- ‘१’ आकडा न लिहिणे: जर तुम्ही ‘१’ हा आकडा न लिहिता थेट २ किंवा ३ पासून सुरुवात केली, तर मत बाद होईल.
- एकापेक्षा जास्त उमेदवारांसमोर ‘१’ लिहिणे: पहिल्या पसंतीचा ‘१’ हा आकडा दोन किंवा अधिक उमेदवारांच्या समोर लिहिल्यास मत अवैध ठरेल.
- शब्दांत लिहिणे: पसंतीक्रम हा केवळ अंकातच (१, २, ३…) लिहायचा आहे. तो ‘एक’, ‘दोन’ किंवा ‘Three’ अशा शब्दांत लिहिल्यास ग्राह्य धरला जाणार नाही.
- चिन्हे किंवा स्वाक्षरी करणे: उमेदवाराच्या नावासमोर राईट (✓ ), क्रॉस (x), फुली, इतर कोणतीही खूण किंवा स्वतःचे नाव/स्वाक्षरी केल्यास मत बाद होईल.
- अंकांची अस्पष्टता: पसंतीचा आकडा दोन उमेदवारांच्या नावाच्या अगदी मधोमध लिहिला, ज्यामुळे तो नेमका कोणासाठी आहे हे स्पष्ट होत नसेल, तरीही मत बाद केले जाईल.
सर्वात महत्त्वाचा नियम कोणता?
मतदारांना मतदान केंद्राच्या आत स्वतःचा कोणताही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन नेता येणार नाही. निवडणूक आयोगातर्फे मतदान कक्षात विशेष जांभळ्या रंगाचा स्केच पेन (Purple Sketch Pen) उपलब्ध करून दिला जाईल. मतपत्रिकेवर केवळ आणि केवळ याच पेनने पसंतीक्रम लिहिणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही पेनचा वापर केल्यास मत त्वरित बाद ठरवले जाईल. या १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारांना मतदानाचे हे नियम समजावून सांगण्यास सुरुवात केली आहे.
