पुण्यात पहाटेपर्यंत पबमध्ये तरुण-तरुणींचा धिंगाणा, आतील दृश्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का
पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या ‘द हौज कम्युन’ पबवर गुन्हे शाखेने रविवारी पहाटे तीन वाजता अचानक धाड टाकत कारवाई केली आहे.

पुणे येथील नाईट लाईफ पुन्हा चर्चेत आले आहे. पुणे क्राईम ब्रँचने पुण्यातील विमाननगर परिसरातील पहाटे चार वाजेपर्यंत दणदणाट सुरु असलेल्या ‘द हौज कम्युन’ पबवर धाड टाकत कारवाई केली आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी चर्चेत असताना पुण्यातील सर्व बार आणि आस्थापना रात्री दीड वाजेपर्यंतची अंतिम वेळ ठरवून दिली असतानाही या पबमध्ये नियम मोडून जोरात संगीत लावून धागडधिंगा सुरु असल्याची टीप मिळाल्यानंतर पुणे क्राईम ब्रँचने रात्री तीन वाजता या पबवर धाड टाकली तर आतील दृश्य पाहून पोलिसांना धक्का बसला.
पुण्यातील विमाननगर येथील एअरो मॉल परिसरातील ‘द हौज कम्युन’ नावाचा पब आहे. या पबमध्ये रविवारी पहाटे उशीरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत लावून पार्टी सुरु होती. या पबमध्ये पोलिस आत शिरले तेव्हा डीजेच्या तालावर मद्यधुंद तरुण आणि तरुणींचा धिंगाणा सुरु होता. डीजेच्या तालावर देहभान हरपून 60 ते 70 तरुण-तरुणी नाचत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी येथील संगित तातडीने बंद करीत व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रात्री दीड वाजेपर्यंत मुदत असताना पहाटे उशीरापर्यंत धिंगाणा सुरु असल्याचे आढळल्याने पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याने पुणे पोलिस आयुक्तांनी नाईट लाईफवर मर्यादा आणली होती. आता पबचालकांकडून या वेळ मर्यादेला हरताळ फासला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
आता कठोर कारवाई केली जाणार
या पबमध्ये मद्यपानासाठी आणि दारुविक्रीसाठी योग्य परवाना होता काय ? पबमध्ये अग्निशमन यंत्रणा आणि इतर नियमांचे पालन केले जात होते की नाही ? अशा प्रकारे रात्री उशीरापर्यंत किती ठिकाणी पब आणि बार सुरु असतात याची आता झाडाझडती केली जाणार आहे. या घटनेमुळे पुण्यातील पब आणि नाईट पार्टीच्या संस्कृती आणि नियमांचे उल्लंघन यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या वेळेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर आता कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.