Rajyasabha Election: संभाजी छत्रपतींना उमेदवारी न देणं शिवसेनेला महागात पडू शकतं, वाचा 5 मोठी कारणे

| Updated on: May 23, 2022 | 10:33 AM

Rajyasabha Election: मराठा समाज हा कायम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मागे राहिला आहे. मधल्या काळात हा समाज किंचित्सा भाजपकडे झुकला होता. मात्र, संभाजीराजेंच्या रुपाने या समाजाला नवं नेतृत्व मिळालं आहे.

Rajyasabha Election: संभाजी छत्रपतींना उमेदवारी न देणं शिवसेनेला महागात पडू शकतं, वाचा 5 मोठी कारणे
संभाजी छत्रपतींना उमेदवारी न देणं शिवसेनेला महागात पडू शकतं, वाचा 5 मोठी कारणे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati ) यांना राज्यसभेवर निवडून जाण्याच्या मार्गातील अडथळे अजूनही दूर झालेले नाहीत. शिवसेनेने संभाजी छत्रपती यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. शिवसेनेत या, शिवबंधन बांधा आणि राज्यसभेवर निवडून (Rajyasabha Eleciton) जा, असं शिवसेनेने (shivsena) म्हटलं आहे. तर, तुम्ही अपक्ष निवडणूक लढवली तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं भाजपनं म्हटलं आहे. त्यामुळे संभाजीराजे यांची कोंडी झाली आहे. भाजपकडे संभाजीराजेंना निवडून आणण्या एवढी मते नाहीत आणि शिवसेनेकडे मते आहेत तर त्यांची ऑफर संभाजीराजेंना मान्य नाही. त्यामुळे संभाजीराजे हे अपक्ष लढण्यावरच ठाम आहेत. संभाजीराजे अपक्ष लढून पराभूत झाले तर त्याचं शिवसेनेलाच नुकसान होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील मराठा वर्ग संभाजीराजेंच्या पाठिशी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हा वर्ग निवडणुकीत शिवसेनेकडे पाठ फिरवू शकतो. त्यामुळे शिवसेनेचं मोठं नुकसान होऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.

मराठा मतांचं नुकसान होणार?

संभाजी छत्रपती हे राज्यसभेवर गेल्यापासून राजकारणात चांगलेच सक्रिय झाले होते. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालेलं असताना संभाजीराजेंनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या आंदोलनाचं नेतृत्वही केलं. मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर अनेक बैठका घेतल्या. राष्ट्रपतींना भेटून मराठा आरक्षणाचा चेंडू त्यांच्या दरबारात मांडला. त्यानंतर त्यांनी उपोषणही केलं. त्यामुळे मराठा समाजात संभाजीराजे लोकप्रिय झाले आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यभर निर्माण झाला आहे. अशावेळी शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारल्यास त्याचं नुकसान शिवसेनेला होऊ शकतं. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मराठा समाजाच्या रोषाची किंमत चुकवावी लागू शकते, असं सूत्रांनी सांगितलं. संभाजीराजेंना विरोध राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही, असं शिवसेना आमदारांनीही म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

आरक्षण आंदोलन पेटणार?

संभाजीराजेंना शिवसेनेने पाठिंबा दिला नाही आणि संभाजीराजे निवडणुकीत पडले तर त्याचे संतप्त पडसाद मराठा समाजात उमटू शकतात. त्यामुळे मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाचं हत्यार उपसलं जाऊ शकतं. राज्य सरकाराल कोंडीत पकडण्यासाठी राज्यभर मराठा आरक्षणाचा भडका उडू शकतो. तसेच इतर प्रश्नांवरही मराठा समाज शिवसेनेला कोंडीत पकडू शकतो. महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मराठा समाजाकडून शिवसेनेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर धक्का दिला जाऊ शकतो. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत हे आंदोलन धगधगतं ठेवलं जाऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.

मराठ्याचं संघटन मजबूत होईल

मराठा समाज हा कायम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मागे राहिला आहे. मधल्या काळात हा समाज किंचित्सा भाजपकडे झुकला होता. मात्र, संभाजीराजेंच्या रुपाने या समाजाला नवं नेतृत्व मिळालं आहे. संभाजीराजेंनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे. राज्यसभेवर जाता नाही आलं तर संभाजीराजे स्वराज्य पक्षाची राज्यभर बांधणी करून निवडणुकीत उतरून शिवसेनेची राजकीय कोंडी करू शकतात. खासकरून स्वराज्य पक्षामुळे शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात जास्त नुकसान पोहोचू शकतं, असा राजकीय व्होरा आहे.

छत्रपतींच्या घराण्याला डावलल्याचा डाग

संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यास छत्रपतींच्या घराण्याला डावलल्याचा डाग शिवसेनेवर लागू शकतो. त्यामुळे मराठा समाजात शिवसेनेविरोधात रोष निर्माण होऊ शकतो. तसेच विरोधकांकडून या मुद्द्याचा राजकीय वापर केला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील व्यक्तीला नाकारणारं हे सरकार असल्याचा प्रचार विरोधकांकडून होऊ शकतो.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही कोंडी

संभाजी छत्रपतींना शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर त्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही नुकसान होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बेस पश्चिम महाराष्ट्रात आहे. संभाजीराजे कोल्हापुरात राहतात. पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाचं मोठं प्राबल्य आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही राजकीय कोंडी केली जाऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कोंडी झाल्यास पर्यायाने महाविकास आघाडीलाच त्याचं नुकसान होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.