
अजिंक्य रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या नशिबाची परीक्षा घेत आहे. उपांत्यपूर्व फेरीत अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. रणजी स्पर्धेत मुंबई संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आहे. तसेच टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी घाम गाळत आहे. 36 वर्षीय अजिंक्य रहाणे याने टीम इंडियात पुनरामगन करेन असा विश्वास व्यक्त केला आहे. अजिंक्य रहाणेने आपल्या भावनांना मोकळी वाट करून देताना सांगितलं की, ‘मी यावेळेस रणजी स्पर्धेत खेळत आहे. मुंबई संघासाठी सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न आहे. माझा प्रयत्न पुन्हा एकदा परतण्याचा आहे. जेव्हा काही वर्षांपूर्वी मला संघातून डावललं गेलं. तेव्हा मी धावा केल्या आणि मला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत निवडलं गेलं. आता मला पुन्हा एकदा बाहेर केलं गेलं आहे. पण हातात आता फक्त चांगलं खेळणं इतकंच आहे.’
‘स्पष्ट आहे की, मी पहिल्या पेक्षा जास्त अनुभवी आहे. पण तरीही मी स्वत:ला तरूण खेळाडू समजतो. मी मोठ्या स्पर्धामध्ये तितक्याच ताकदीने उतरण्याची क्षमता ठेवतो. मी या खेळावर प्रेम करतो आणि चांगली कामगिरी करण्याची भूक कायम आहे. मी माझ्या खेळाने कधीच संतुष्ट नसतो आणि कोणतीच गोष्ट गृहीत धरत नाही.’, असं अजिंक्य रहाणे याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.
‘मी आधी लाजरा होतो, पण आता तसं नाही. मी आधी क्रिकेट खेळून घरी जायचो. पण मला आता काही जणांनी सांगितलं की, मेहनतीबद्दल बोललं पाहीजे. तुम्हाला बातम्यांमध्ये असलं पाहीजे. माझ्याकडे पीआर टीम नाही. माझा एकमेव पीआर म्हणजे माझे क्रिकेट… पण आता कळले आहे की बातम्यांमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. नाही तर लोकांना वाटतं की मी या वलयाबाहेर गेलो आहे.’, असंही अजिंक्य रहाणे म्हणाला.
अजिंक्य रहाणे रणजी स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने 12 डावात 437 धावा केल्या आहेत. हरियाणाविरुद्धच्या साम्यात त्याने शतकी खेळीही केली. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याने 469 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. मेगा लिलावातील पहिल्या फेरीत त्याला घेण्यास कोणीही रस दाखवला नव्हता. पण दुसऱ्या फेरीत कोलकात्याने त्याला संघात घेतलं. इतकंच त्याच्या खांद्यावर कोलकात्याची कमान सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजिंक्य रहाणेला टीम इंडियाची दारं इंग्लंड दौऱ्यात खुली होऊ शकतात.