IND vs PAK : पाकिस्तान विरुद्धच्या दणदणीत विजयानंतरही भारताला मोठा झटका, नक्की काय झालं?
Asia Cup 2025 IND vs PAK : टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीतील आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले. भारताने यूएईनंतर पाकिस्तानचा धुव्वा उडवला. मात्र भारताला पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यानंतर मोठं नुकसान झालं आहे.

टीम इंडियाने रविवारी 14 सप्टेंबरला आशिया कप 2025 स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यूएईनंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला. भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताचा पाकिस्तान विरुद्ध हा दुबईतील दुसरा टी 20I विजय ठरला. सूर्याने विजय मिळवून देत भारताला बर्थडे गिफ्ट दिलं. भारताने या विजयासह सुरक्षितरित्या स्पर्धेतील दुसर्या टप्प्यात धडक दिली. टीम इंडियाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. मात्र या विजयानंतरही टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.
टीम इंडियाचं नुकसान
टीम इंडियाला पाकिस्तान विरूद्धच्या विजयानंतरही तोटा सहन करावा लागला आहे. टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. टीम इंडियाने यूएईनंतर पाकिस्तानवर मात करत एकूण 4 पॉइंट्सची कमाई केली. मात्र भारताला नेट रनरेटमध्ये फटका बसला आहे.
टीम इंडियाने 10 सप्टेंबरला या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात यूएईवर मोठा विजय मिळवला. भारताने 58 धावांचं आव्हान फक्त 27 बॉलमध्ये पूर्ण केलं. त्यामुळे टीम इंडियाचा नेट रनरेट 10.483 इतका झाला होता. मात्र पाकिस्तान विरूद्धच्या विजयानंतर नेट रनरेटमध्ये मोठी घट झाली आहे.
टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धचा सामनाही काही ओव्हरआधी जिंकला. भारताने 128 धावांचं आव्हान हे 25 बॉलआधी पूर्ण केलं. मात्र त्यानंतरही नेट रनरेटमध्ये मोठी घट झालीय. ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा नेट रनरेट हा 4.793 असा झाला आहे.
पाकिस्तानला पराभवानंतर झटका
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान पराभवानंतरही ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी कायम आहे. पाकिस्तानने 2 पैकी 1 सामना जिंकलाय. तर 1 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. पाकिस्तानच्या खात्यात 2 पॉइंट्स आहेत. तसेच पाकिस्तानचा नेट रनरेट 1.649 असा झाला आहे, जो टीम इंडिया विरूद्धच्या सामन्याआधी 4.650 असा होता.
टीम इंडियाचा तिसरा सामना केव्हा?
दरम्यान भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीतील आपला तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा हा सामना शुक्रवारी 19 सप्टेंबरला होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात ओमान विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने सुपर 4 मध्ये आधीच प्रवेश केला आहे. त्यामुळे टीम इंडिया ओमान विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
