
क्रिकेट चाहत्यांना सध्या आशिया कप 2025 स्पर्धेचे वेध लागले आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघात 28 सप्टेंबर पर्यंत चुरस पाहायला मिळणार आहे. तर वूमन्स टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेआधी मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. मालिकेसाठी 19 ऑगस्टला भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. हरमनमप्रीत कौर भारताचं नेतृत्व करणार आहे. मात्र त्या मालिकेआधी भारतीय संघाला मोठा झटका लागला आहे.
भारतीय संघाची अनुभवी गोलंदाज गोहर सुल्ताना हीने अपेक्षित निर्णय घेतला आहे. गोहरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. गोहर गेल्या 11 वर्षांपासून टीम इंडियापासून दूर होती. त्यामुळे गोहरचं आज न उद्या निवृत्त होणं अपेक्षित होतं. गोहरने वयाच्या 37 व्या वर्षी हा निर्णय घेतला. गोहरने इंस्टाग्रामवरुन निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्मा आणि आणि विराट कोहली या दोघांनीही इंस्टाग्रामद्वारे निवृत्ती जाहीर केली होती.
हसत हसत क्रिकेटला अलविदा. भारतीय जर्सी गर्वाने परिधान करण्याच्या अनेक वर्षांनतंर आता क्रिकेट कारकीर्दीतील सर्वात भावनिक क्षणाबाबत लिहण्याची वेळ आली आहे. मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर करतेय. भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. सर्व सहकारी, प्रशिक्षक, निवड समिती आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांचे आभार”, असं म्हणत गोहरने निवृत्ती जाहीर केली आणि सर्वांचे आभार मानले.
फिरकीपटू गोहरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 95 विकेट्स घेतल्या. गोहरने वनडेत 66 तर टी 20i मध्ये 29 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. गोहरची 4 धावा देऊन 4 विकेट्स ही वनडेतील सर्वोच्च कामगिरी ठरली. तसेच गोहर वूमन्स प्रीमीयर लीग स्पर्धेत एकूण 2 हंगामात खेळली. मात्र तिला एकही विकेट मिळवता आली नाही.
गोहरने भारताचं 50 एकदिवसीय आणि 37 टी 20i सामान्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. मात्र गोहर गेल्या अनेक वर्षांपासून टीममधून बाहेर होती. गोहरने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा एप्रिल 2024 मध्ये खेळला होता. गोहर टीम इंडियासाठी फक्त 7 वर्ष खेळली. गोहरने मे 2008 मध्ये पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.