
मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलमधून लाखो जण प्रवासी करतात. रोजच्या प्रवाशांना गर्दीची कल्पनाही असते, पण कधीकधी याच लोकलमध्ये असं काही घडतं की डोळ्यांवर विश्वासच बसत नाही, मन अगदी सुन्नं होतं. असाच एक धक्कादायक प्रकार आणि अंगावर शहारे आणणारी घटना लोकलमध्ये घडली आहे. महिलांच्या डब्यात एक पुरूष चढला, ते पाहून इतर महिलांनी त्याला खाल उतरण्यास सांगितलं. मात्र यामुळे संतापलेल्या त्या इसमाने एका 18 वर्षाच्या तरूणीला धावत्या लोकलमधूने थेट खाली ढकलून फेकून दिलं. यामुळे प्रवाशांना प्रचंड धक्का बसला, अनेक जण सुन्न झाले. मात्र काही महिला प्रवाशांवी हिंमत दाखवत त्या आरोपी प्रवाशाला पकडलं आणि जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आधी डब्यात चढला, नंतर तरूणीलाच लोकलमधूीन ढकललं
मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय शेख अख्तर नवाज असे आरोपीचे नाव असून तो मुंबईल लोकलमधील महिलांच्या डब्यात चढला होता. ते पाहून डब्यातील काही महिला प्रवाशांनी त्याला खाली उतरण्यास सांगितलं, यावरून त्यांच्यात बोलाचाली झाली. एका 18 वर्षांच्या तरूणीनेही नवाज याला विरोध दर्शवत खाली उतरायला सांगितलं. मात्र ते ऐकून आरोपी प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या तरुणीला चालत्या लोकलमधून धक्का देऊन बाहेर फेकलं. खाली पडलेली ती तरूणी गंभीर जखमी झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली.
ट्रेनमधून पडल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीने कसाबास वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तातडीने तिला शोधून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या तरूणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याच दरम्यान त्या लोरकलमधील इतर महिलांनी आरोपी नवाजला पकडलं आणि त्याला जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पनवेल जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली .या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवसा ढवळ्याही महिला सुरक्षित नसल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. पनवेल जीआरपी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.