
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अनेक नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. उद्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून चिन्हांचे वाटपही होणार आहे. त्यानंतर जोमाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. असं असतानाच आज नवी मुंबईत भाजपकडून मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शरद पवारांच्या पक्षाला ऐन निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, आदरणीय मोदीजी व आदरणीय देवेंद्रजींच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन नवी मुंबई परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. यात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) लीलाताई वाघमारे, कुंदा वाघमारे, जसप्रीत कौर, अर्चना पवार, मनिष तांबे, अमित शिंदे, युवा सेना प्रमुख डॉ. चेतना शिंदे, विभागप्रमुख धनराज सोनावणे, विभागप्रमुख सचिन कळमकर, उपविभागप्रमुख काशिनाथ भोईटे, शाखाप्रमुख बाळू शिंदे, उपशाखाप्रमुख चंद्रकांत लोहाटे, महिला आघाडी प्रमुख शीतल शिंदे, काँग्रेस समन्वयक दिलीप देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे. आजच्या पक्ष प्रवेशाने नवी मुंबईतील भाजपा परिवाराचे संघटन आणखी मजबूत झाले आहे. सर्वांचे स्वागत आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
आदरणीय मोदीजी व आदरणीय देवेंद्रजींच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन नवी मुंबई परिसरातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश. आजच्या पक्ष प्रवेशाने नवी मुंबईतील भाजपा परिवाराचे संघटन आणखी मजबूत झाले आहे. सर्वांचे स्वागत आणि पुढील… pic.twitter.com/dfYjx0tkRA
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) January 2, 2026
आजच्या या पक्ष प्रवशाच्या कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेतील उमेदवार, भाजपाचे मंडल अध्यक्ष व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आता दोन दिवसांनंतर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते प्रचारात व्यस्त असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेही प्रचाराला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.