आधी उत्तर भारतीय महापौराची भाषा अन् आता मराठीचा पुळका, भाजप नेत्याचा मोठा युटर्न, थेट म्हणाले…
मीरा-भाईंदरमधील उत्तर भारतीय महापौरपदाच्या वादावर भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, मराठी आपली संस्कृती असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सध्या सर्वत्र उत्तर भारतीय महापौर या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी येत्या काळात मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय झाला पाहिजे, असे विधान केले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. आता कृपाशंकर सिंह यांनी याबद्दल अखेर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. विरोधकांनी मराठी आणि हिंदी भाषेचा वाद उकरून काढू नये, असा थेट इशारा कृपाशंकर सिंह यांनी दिला आहे. मराठी ही केवळ आमची भाषा नाही, तर ती आमची संस्कृती आहे,” असे कृपाशंकर सिंह म्हणाले.
काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित समुदायाने मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय समाजाचा महापौर कधी बसणार? असा सवाल केला होता. त्यावर भाष्य करताना कृपाशंकर सिंग म्हणाले होते की, “जर तुम्हाला तुमचा महापौर हवा असेल, तर आधी मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणा.” या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. यावेळी विरोधकांनी विशेषतः शिवसेना ठाकरे गट, मनसेने भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजप मराठी माणसाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
माझ्या मराठी प्रेमाची कुणीही परीक्षा घेऊ नये
आज याबद्दल कृपाशंकर सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले. मी महाराष्ट्रात आलो, इथल्या मातीने मला मोठे केले. मराठी भाषेबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. माझी मराठी बोलताना काही चुका होत असतील, पण मी ती मनापासून आणि भावनेतून बोलतो. माझ्या मराठी प्रेमाची कुणीही परीक्षा घेऊ नये, असे कृपाशंकर सिंह म्हणाले.
समाजात तेढ निर्माण केली जातेय
लोकांनी एक भावना व्यक्त केली होती, त्याला मी लोकशाहीतील संख्याबळाच्या आधारावर उत्तर दिले. परंतु, अंतिम निर्णय हा महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते एकत्र बसून घेतील. वैयक्तिक इच्छांपेक्षा पक्षाचे धोरण सर्वोच्च असते. मुंबईचा महापौर हा मराठीच असायला हवा आणि तो हिंदूच असायला हवा, ही आमची स्पष्ट भूमिका आहे, असे कृपाशंकर सिंह यांनी खडसावून सांगितले. संजय राऊत हे खासदार आहेत, मोठे नेते आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवले पाहिजे. निवडणुका जवळ आल्या की काही लोकांना मुंबई आणि प्रांतवादाची आठवण येते. माझा व्हिडिओ जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करून समाजात तेढ निर्माण केली जात आहे, असेही कृपाशंकर सिंह म्हणाले.
दरम्यान मीरा भाईंदरमध्ये मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे. कृपाशंकर सिंग यांनी एका बाजूला उत्तर भारतीय समाजाला संख्याबळ वाढवण्याचा सल्ला देऊन त्यांना प्रोत्साहित केले, तर दुसऱ्या बाजूला मराठी ही संस्कृती असल्याचे सांगून मराठी मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
