
कालपासून त्या दोन उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नाही, तर कुटुंब देखील भीतीच्या वातावरणा आहेत अशी माहिती सचिन डफळ यांनी दिली आहे. दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर उभे आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. कालच मनसेचे पदाधिकारी पोलीस कोतवाली स्टेशनमध्ये दाखल झाले आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाची मागणी केली.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत एकूण 1230 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
दक्षिण मुंबईतील बंडखोरी शमवण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळालं आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार कमलाकर दळवी हे आपला अर्ज मागे घेणार आहेत.
नागपूरच्या प्रभाग क्रमांक 13 मधील भाजप उमेदवार किसान गावंडे यांना लोकांनी घरातच बंद केलं आहे. गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून समर्थकांनी त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावून त्यांना घरातच बंद केलं आहे.
प्रभाग क्रमांक 95 मधील चंद्रशेखर वायंगणकर नॉट रीचेबल. वायगंणकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. तर प्रभाग क्र 95 मधून हरी शास्त्री हे ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. शास्त्री यांना उमेदवारी दिल्याने वायंगणकर नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, मात्र वायंगणकर हे नॉट रिचेबल आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील काळखडक परिसरात वाहनांची तोडफड करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने काळाखडक परिसरात 5 ते 7 वाहनांची तोडफोड केली. दहशत पसरवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असून त्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.
पंजाबचे माजी पोलीस महानिरीक्षक (IG) अमर सिंग यांनी सायबर फसवणुकीमुळे केलेल्या आत्महत्या प्रयत्न प्रकरणाचे धागेदोरे आता मीरा भाईंदरपर्यंत पोहोचले आहेत. तब्बल ८ कोटी रुपयांच्या ऑनलाइन गुंतवणुकीच्या फसवणुकीतून खचलेल्या अमर सिंग यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पंजाब पोलिसांनी आता मोठी कारवाई करत मीरा भाईंदरमधून तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये भाजपच्या मीरा भाईंदर पूर्वेकडील नवघर युवा मंडळाचा अध्यक्ष शेरा ठाकूर याचाही समावेश आहे. या आरोपींनी बनावट कंपन्या आणि बँक खात्यांच्या माध्यमातून फसवणुकीची रक्कम वळवल्याचा संशय आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राजकीय घराण्यांमधील उमेदवारीची चर्चा नेहमीच रंगते, मात्र प्रभाग क्रमांक १६ मध्ये यावेळी एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांना पक्षाने यंदा तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. विशेष म्हणजे, प्रज्ञा खानोलकर यांच्यासह त्यांचे चुलत बंधू मयुरेश खानोलकर यांनीही अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. एकाच कुटुंबातील हे दोन सदस्य आता राष्ट्रवादी आणि भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे करणार आहेत. भाऊ-बहिणीच्या या जोडीमुळे प्रभाग १६ मधील लढत आता चुरशीची आणि बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिकमध्ये भाजपातील अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी आता नाशिकमध्येच तळ ठोकला आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नाशिकमधील विविध मतदारसंघांत पक्षाच्या अनेक अधिकृत उमेदवारांविरुद्ध कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. या बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांना अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी गिरीश महाजन स्वतः मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे, सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्या माध्यमातून मध्यस्थी करून ही बंडखोरी शमवण्याचे मोठे आव्हान महाजन यांच्यासमोर आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे पराभूत उमेदवार अमित वाहुळ यांनी आपला पराभव हा जादूटोण्यामुळे झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी मतदान केंद्राबाहेर जादूटोण्याचे साहित्य टाकण्यात आले होते, ज्यामुळे भीतीपोटी नागरिकांनी मतदान केले नाही, असा दावा वाहुळ यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या विचित्र आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जंजाळ यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. जंजाळ यांनी आपल्या उमेदवारी प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची माहिती लपवल्याचा आरोप करत त्यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंची पडताळणी केल्यानंतर हा आक्षेप फेटाळल्याने जंजाळ यांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात आहेत. दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले, निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव पाहायला मिळत आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला
655 ग्रॅम वजनाचा तथा 80 लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण. आकर्षक नक्षिकाम असलेला हिरे जडीत सुवर्ण मुकुट. हरियाणाच्या फरीदाबाद येथील साईभक्त प्रदीप मोहंती यांच्याकडून साई चरणी सुवर्ण दान. मुकुटात 585 ग्रॅम शुद्ध सोने आणि सुमारे 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे. साई संस्थानकडून दानशूर साईभक्ताचा सत्कार…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई बंगल्यावरती चंद्रकांत टिंगरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अजित पवारांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. यामुळे विविध चर्चांना उधाण आले असून महत्वाची बैठक यांच्यात होणार आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप–युवा स्वाभिमान युती तरीही रवी राणांच्या पक्षाचे अमरावती महानगरपालिकेत 41 उमेदवार.. युती असूनही भाजपला फटका बसण्याची शक्यता रवी राणांची भेट घेऊन चर्चा करणार बावनकुळे. रवी राणा हे आता आपल्या उमेदवारांची उमेदवारी मागे घेनार का असा प्रश्न.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरातील टाऊन हॉलमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता . या या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना रवींद्र चव्हाण यांनी पप्पू कलानीवर नाव न घेता टीका केली जर उल्हासनगर शहरातील गुंडाराज संपवायचं असेल आणि उल्हासनगर शहरात बदल घडवायचा असेल तर भाजपला मतदान करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भलतंच घडलंय. एकाचं जागेसाठी दोन पक्षांकडून उमेदवारी मिळालेले दोन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 20 ‘ब’ आणि 30 ‘अ’ जागेवर हा पेच निर्माण झालाय. नीलम म्हात्रे यांना प्रभाग 20 मधील ब जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेकडून एबी फॉर्म घेतले. तसेच संदीप गायकवाड यांना प्रभाग 30 मधील ‘अ’ जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेनं ही एबी फॉर्म घेतले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. आमदार रवी राणांची ते भेट घेतील. महापालिका निवडणुकीत भाजप–युवा स्वाभिमान युती तरीही रवी राणांच्या पक्षाचे अमरावती महानगरपालिकेत 41 उमेदवार उभे केले आहेत.युती असूनही भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर राणा हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शेतजमिनीचा वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी असलेली सलोखा योजनेला दि. १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ आहे. या योजनेअंतर्गत नाममात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार तुमच्या बंगल्यावरती बंडखोरी रोखण्यासाठी खलबत सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये लढणाऱ्या उमेदवारांशी अजित पवार यांनी चर्चा केली.महापालिका पालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.पक्षातून होणारी बंडखोरी रोखण्यासाठी अजित पवार यांच्याकडून आज सकाळपासूनच जिजाई बंगल्यावरती उमेदवारांना बोलवून त्यांच्याशी अजित पवार यांच्याकडून चर्चा केली जात आहे.
पुण्याच्या राजगुरुनगर शहरात AI च्या माध्यमातून तयार केलेल्या बिबट्याच्या डरकाळी फोडणाऱ्या फेक व्हिडिओमुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा व्हिडिओ तयार करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी धरले असून त्याने हा व्हिडिओ तयार केल्याची कबुली दिली आहे. राजगुरुनगर शहरात एका तरुणाने AI टूलचा वापर करून बिबट्या डरकाळी फोडत असल्याचा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला, ज्यामुळे शहरात भीती पसरली आहे. नागरिकांनी संतापात या तरुणाला धरून आणि त्याच्याकडून व्हिडिओ बनविला असल्याची कबुली घेतली. पुणे जिल्ह्यात अशा AI जनरेटेड बिबट्या व्हिडिओ व्हायरल होण्याच्या घटना वाढत आहेत, ज्यामुळे वन विभागाला अडचणी येत आहेत
श्री तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सव निमित्त तुळजाभवानी मातेला भवानी तलवार अलंकार महापूजा करण्यात आली. शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेला तुळजाभवानी मातेची भवानी अलंकार महापूजा मांडण्यात आली.वर्षभरात शारदीय नवरात्र महोत्सव, शाकंभरी नवरात्र महोत्सव आणि शिवजयंती अशी तीन वेळा तुळजाभवानी मातेची भवानी अलंकार पूजा मांडण्यात येते.भवानी अलंकार पूजा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी माता तलवार देतानाचे चित्र साकारले जाते.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाची अंतिम उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली.या अंतिम यादीत 29 पैकी 14 प्रभागात 51 अधिकृत उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.एमआयएम ने या निवडणुकीत अनेक जुन्या नगरसेवकांचे तिकीट कापत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे
मुंबईतील अनेक आमदार माजी नगरसेवक आणि नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट मिळालं. तन्वी काते आणि समृद्धी काते यांना उमेदवारी देण्यात आली.जोगेश्वरीतून दिप्ती रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली. वर्सोवा इथून जेष्ठ शिवसैनिक राजूल पटेल यांना उमेदवारी,कांजूरमार्ग इथून आमदार सुनिल राऊत यांचेयासमोर निवडणुक लढवलेल्या सुवर्णा करंजे यांना उमेदवारी,कुर्ला इथून आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर यांना तर चांदिवलीतून आमदार दिलीप मामा लांडे यांच्या घरात शैला दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. बंडखोरांना थोपवण्याचे मोठे आव्हान पक्षांसमोर आहे. आत राज्यभरात महापालिका निवडणुकीचा धुराळा पाहायला मिळेल. प्रचाराला वेग येईल. 15 जानेवारी रोजी मतदार आणि दुसऱ्या दिवशी लागलीच मतमोजणी होणार आहे. आज उद्धव ठाकरे हे उमेदवारांना संबोधित करणार आहे. तर उद्या शिंदे सेना आणि भाजपचा वरळीत संयुक्त मेळावा आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मुंबईवर अमराठी महापौर लादण्याचा प्रयत्न केल्यास भडका उडेल असा सामनातून इशारा देण्यात आला आहे. तर प्रवाशांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे.