
राज्यात पहिल्यांदाच मनसे (MNS) आणि ठाकरे गटाची (Shivsena UBT) युती झाल्याने या युतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासकरून मुंबईत ही युती काय चमत्कार करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दोन्ही बंधूंमधील जागा वाटपाचा तिढाही सुटलेला आहे. उमेदवारांनी अर्जही भरले आहेत. आणि दोघेही येत्या 5 तारखेपासून सभांचा धडाका सुरू करणार आहेत. पण त्यापूर्वीच मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीत माशी शिंकली आहे. मुंबईतील 227 पैकी एका जागेवर ठाकरे गट आणि मनसेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. पण या एका जागेचा तिढा का सुटला नाही? याचीही चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईत वार्ड क्रमांक 67 मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. या वार्डातून मनसे आणि शिवसेना ठाकरे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अधिकृत अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेनंतर मुंबई महानगरपालिकेकडून माहिती देण्यात आली. त्यात वॉर्ड क्रमांक 67मध्ये ठाकरे सेना आणि मनसे या दोन्ही उमेदवारांची नावे असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातील एक उमेदवार माघार घेणार की या एका मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे दोन उमेदवार रिंगणात
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 67 मध्ये मनसे आणि ठाकरेंची सेना या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने इथे नेमक काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंधेरी पश्चिमेकडील या प्रभागातून मनसेने कुशल धुरी यांना मैदानात उतरवलं आहे. तर ठाकरेंकडून शरद जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 67 मध्ये मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा रंगू लागली आहे.
12 उमेदवार मैदानात
या मतदारसंघात एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. भाजपने दीपक कोतेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर समाजवादी पार्टीने प्रकाश कोकरे आणि वंचितने पीर मोहम्मद शेख यांना उमेदवारी दिली आहे. या वॉर्डात मनसे, ठाकरे गट, भाजप आणि वंचित यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. त्यामुळे मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एक संधी…
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या 2 जानेवारी ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दोन्हीपैकी एका उमेदवाराला संधी आहे. जागा वाटपात ज्या पक्षाच्या वाट्याला ही जागा आली, त्या पक्षाचा उमेदवार कायम राहिल. आणि दुसऱ्या उमेदवाराला माघार घ्यावी लागणार आहे, असं चित्र आहे. मात्र, उमेदवारी मागे घेतली जाते की मैत्रीपूर्ण लढत होते, हे उद्याच समजणार आहे.