
राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये प्रत्येक अनेक प्रकारच्या आघाड्या झाल्या आहेत. एका महापालिकेत एकत्र लढणारे दुसऱ्या महापालिकेत एकमेकांचे विरोधक बनून एकमेकांना आव्हान देताना दिसत आहे. मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची युती झाली आहे. या युतीत शरद पवार यांचाही गट आहे. तर, दुसरीकडे भाजप, शिंदे गटाची महायुती झाली आहे. मुंबईत अजितदादा गट स्वबळावर लढत आहे. तर काँग्रेस आणि वंचितने युती करून सर्वांनाच घाम फोडला आहे. ठाकरे, मनसेच्या युतीत शरद पवार गटाच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत. पण त्यातील एक जागा निवडणूक लढण्यापूर्वीच गमावण्याची पवार गटावर नामुष्की आली आहे. हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 107 हा शरद पवार गटाच्या वाट्याला आला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या या मतदारसंघाचे माजी नगरसेवक आहेत. नील सोमय्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या भरत दणाणी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण दणाणी यांचा अर्ज बाद झाल्याने सोमय्या यांचा विजय सोपा झाला आहे. तर उमेदवाराचा अर्ज बाद होणे हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. लढण्यापूर्वीच सीट गमावण्याची वेळ पवार गटावर आल्याचं बोललं जात आहे.
तर विजय निश्चित…
शरद पवार गटाचे उमेदवार भरत दणाणी यांचा अर्ज बाद झाल्याने नील सोमय्या यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, या वॉर्डातून एकूण 9 उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी एका उमेदवाराला शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने पाठिंबा दिल्यास मनसे आणि ठाकरे गटही या उमेदवाराच्या पाठी उभे राहतील. त्यामुळे नील सोमय्या यांची डोकेदुखी वाढू शकते.
उद्या काय घडणार ?
पण जर शरद पवार गटाने कुणालाच पाठिंबा नाही दिला तर ही निवडणूक एकतर्फी होऊ शकते. प्रमुख विरोधी पक्षच समोर नसल्याने नील सोमय्या यांना दुसऱ्यांदा महापालिकेत जाण्याचा मान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.