
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे प्रशासनाने मोठे बदल केले आहेत. रेल्वे प्रशासनाने आता सर्व डिजीटल सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या उद्देशाने रेल वन (Rail One) हे नवीन अधिकृत अॅप सुरु केले आहे. यामुळे UTS मोबाईल अॅपवरील मासिक पास काढण्याची सुविधा आता कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या UTS (Unreserved Ticketing System) ॲपवरून पास काढण्याची आणि तिकीट काढण्याची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता मुंबई लोकलचे मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पास केवळ रेल वन (Rail One) या एकाच अधिकृत मोबाइल ॲप्लिकेशनवर उपलब्ध असणार आहेत. प्रवाशांना तिकीट बुकिंगच्या विविध सेवांसाठी वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करावा लागत होता. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि वन नेशन, वन ॲप या संकल्पनेला चालना देण्यासाठी रेल्वेने रेल वन हे अॅप विकसित केले आहे. यामध्ये तिकीट बुकिंगसोबतच ट्रेनचे लाईव्ह स्टेटस, प्लॅटफॉर्म क्रमांक आणि रेल्वेच्या इतर सुविधाही एकत्र देण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.
या नवीन बदलामुळे प्रवाशांना आता जुन्या UTS ॲपचा वापर करता येणार नाही. ज्या प्रवाशांनी आधीच पास काढलेले असतील, त्यांचे पास हे अद्याप वैध आहेत, त्यांना ते पास संपेपर्यंत वापरता येतील. मात्र, नवीन पास काढण्यासाठी किंवा जुन्या पासचे नूतनीकरण (Renewal) करण्यासाठी प्रवाशांना रेल वन अॅपचा वापर करता येणार आहे. यासाठी आपल्या मोबाईलमध्ये रेल वन ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करणे अनिवार्य असेल. हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरम्यान, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने या ॲपमध्ये यूपीआय (UPI), नेट बँकिंग आणि कार्ड पेमेंटचे सुलभ पर्यायही दिले आहेत. विशेष म्हणजे, रेल वन ॲपमध्ये आर-वॉलेटची (R-Wallet) सुविधाही दिली आहे. तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा तिकीट बुक होताना प्रवाशांचे पैसे अडकण्याचे प्रकार घडायचे, ते टाळण्यासाठी या नवीन ॲपमध्ये हाय-स्पीड पेमेंट गेटवे वापरण्यात आले आहे. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी स्थानकांवरील तिकीट खिडक्यांसमोर लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे. मासिक पाससाठी रेल्वे स्थानकांवरील खिडक्यांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी प्रवाशांनी जास्तीत जास्त रेल वन अॅपचा वापर करावा, असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेने केले आहे.