नाथाभाऊ मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच, त्यांनी पवारांच्या नेतृत्वात काम केलंय; दानवेंचा गौप्यस्फोट

| Updated on: Oct 23, 2020 | 11:55 AM

नाथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. ते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील एस काँग्रेसमध्ये होते, असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळे दानवे यांच्या या दाव्याला खडसे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाथाभाऊ मूळचे राष्ट्रवादीचेच, त्यांनी पवारांच्या नेतृत्वात काम केलंय; दानवेंचा गौप्यस्फोट
Follow us on

मुंबई: भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. ते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील एस काँग्रेसमध्ये होते, असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळे दानवे यांच्या या दाव्याला खडसे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (eknath khadse is originally congress congressman, says raosaheb danve)

टीव्ही9 मराठीशी एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत देताना रावसाहेब दानवे यांनी हा गौप्यस्फोट केला. नाथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एस काँग्रेसची स्थापना केली होती. त्यात नाथाभाऊ होते. त्यावेळी पवारांना नागपूर ते पंढरपूर दिंडी काढली होती. त्यातही नाथाभाऊ होते, असा दावा दानवे यांनी केला. मी भाजपमध्ये नाथाभाऊंना सीनियर आहे. त्यामुळे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, एकनाथ खडसे आदी आम्हा सर्वांना एकमेकांची वाटचाल माहीत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

अशा घटना घडत असतात

राजकारणात पक्ष सोडण्याच्या घटना घडत असतात. अनेक नेते अनेक वर्षे पक्षात राहून नंतर पक्ष सोडतात. नाथाभाऊंनी सत्ता भोगली. पदं भोगली आणि 40 वर्षानंतर पक्ष सोडला. त्यांनी पक्ष सोडू नये असं वाटत होतं. त्यांच्या मनातली खदखद सर्वांनाच माहीत होती. ते आज ना उद्या निर्णय घेतील असंही वाटत होतं. त्यामुळे त्यांचं अनेकदा मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच पक्षात जाण्याची त्यांच्यावर वेळ आली, असा टोलाही त्यांनी लगावला.

नाथाभाऊ भाजप सोडून का गेले याला अनेक कारणे आहेत. कुठून सुरुवात करावी हा प्रश्न आहे. एकेकाळी भाजपमध्ये केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. पण भाजपची सत्ता येईल की नाही याची शंका असल्याने नाथाभाऊंनी तब्येतीचं कारण देत लालदिव्यासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडलं. त्यामुळे हे पद देवेंद्र फडणवीसांकडे आलं. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षालाच मुख्यमंत्री केलं जातं. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याकाळात खडसेंनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं असतं तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रिपदावर दावा करता आला असता, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने खडसे नाराज झाले होते. पण त्यांच्याकडे अर्ध्याहून अधिक महत्त्वाची खाती देण्यात आली. तरीही ते नाराज होते. त्यांनी फडणवीस सरकारशी जुळवून घेतले नाही. त्यांचे सरकारसोबत संबंध सुधारतील असं वाटत नव्हतं. नंतरच सर्व तुम्हाला माहीतच आहे, असं ते म्हणाले. (eknath khadse is originally congress congressman, says raosaheb danve)

संबंधित बातम्या:

‘लालदिव्या’साठी प्रदेशाध्यक्षपद नाकारलं, त्यामुळेच नाथाभाऊंचं मुख्यमंत्रिपद गेलं; दानवेंचा गौप्यस्फोट

‘वाजपेयी-अडवाणी नसल्यानेही भाजप पक्ष थांबला नाही; नाथाभाऊ जाण्यानेही थांबणार नाही’

नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीकेसाठी करु नये, रावसाहेब दानवेंचा सल्ला

(eknath khadse is originally congress congressman, says raosaheb danve)