Sharad Pawar: पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा 38 आमदार फुटले, शिंदेंनी 50 फोडले, तेव्हा दोर कापले गेले, आता?; हिस्ट्री रिपीट होतेय?

Sharad Pawar: 1978 मध्ये शरद पवार यांनी बंड केलं होतं. शरद पवार हे त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये होते. त्यावेळी त्यांनी वसंतदादांविरोधात बंड केलं. 38 आमदार घेऊन ते बाहेर पडले. सरकारमधून बाहेर पडताना त्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे वसंतदादांकडे पाठवले होते.

Sharad Pawar: पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा 38 आमदार फुटले, शिंदेंनी 50 फोडले, तेव्हा दोर कापले गेले, आता?; हिस्ट्री रिपीट होतेय?
राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वाटत नाही, पण लागली तर निवडणुका होतील
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jun 24, 2022 | 8:26 PM

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेत (shivsena) बंड केलं आहे. त्यांच्यासोबत 50 आमदारांनीही बंड केलं आहे. यात शिवसेनेचे आणि अपक्ष आमदारही आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील हे सर्वात मोठं बंड असल्याचं मानलं जात आहे. या पूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी बंड केलं होतं. 38 आमदारांना घेऊन ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि स्वत:चं सरकार स्थापन केलं होतं. इतिहासात पुलोद सरकार म्हणून याची नोंद आहे. पवारांनी बंड केलं तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले होते. परतीचे दोरच कापून टाकण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. एकनाथ शिंदे यांनी मात्र, मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. त्यांच्यासोबतच्या मंत्र्यांनीही राजीनामा दिला नाही. पण बंड मागे घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नाही? असा सवाल केला जात आहे.

इतिहासात काय घडलं?

1978 मध्ये शरद पवार यांनी बंड केलं होतं. शरद पवार हे त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये होते. त्यावेळी त्यांनी वसंतदादांविरोधात बंड केलं. 38 आमदार घेऊन ते बाहेर पडले. सरकारमधून बाहेर पडताना त्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे वसंतदादांकडे पाठवले होते. त्यापूर्वीच जनता पक्षाबरोबरही बोलणी झाली होती. पवारांनी बंड केल्याचं यशवंतराव चव्हाण यांना कळलं तेव्हा त्यांनी सरकार पाडण्याचा निर्णय थांबवा, असं आवाहन केलं. पण तोपर्यंत राजीनामे गेले होते. दोर कापले गेले होते. त्यानंतर वसंतदादांचं सरकार पडलं. दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वाखाली समांतर काँग्रेसची स्थापना झाली. तसेच राज्यात नवं सरकार आलं. त्याला पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) असं नाव देण्यात आलं. शरद पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आणि पवार मुख्यमंत्री झाले.

पवारांचं दुसरं बंड

पवारांच्या बंडानंतर आतापर्यंत राज्यात अनेक बंड झाले. अनेक पक्ष फुटले. स्वत: शरद पवार दुसऱ्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडले. सर्वात आधी 1978मध्ये बंड केलं होतं. त्यानंतर पवारांनी दुसरं बंड केलं ते 1999मध्ये. तब्बल 21 वर्षांनी हे बंड केलं. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 58 आमदार निवडून आले होते. तर काँग्रेसचे 75 आमदार निवडून आले. परंतु, त्यानंतर काँग्रेसची सातत्याने पिछेहाट झाली आणि राष्ट्रवादी राज्यात वाढत गेली.

अजित पवारांचं फसलेलं बंड

त्यानंतर अजित पवारांच्या रुपाने राज्यात आणखी एक मोठं बंड पाहायला मिळालं. अजितदादांनी 2019मध्ये बंड केलं. नोव्हेंबर 2019मध्ये झालेल्या या बंडाने एकच खळबळ उडाली होती. अजित पवार यांनी देवेंद्र फडवणवीसांशी हातमिळवणी करून पहाटेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी या बंडाची प्रचंड चर्चा झाली होती. अजित पवारांसोबत 30 आमदार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, शरद पवार यांनी मोठ्या कौशल्याने हे बंड मोडून काढलं.

हे सुद्धा वाचा

आता काय घडतंय

राज्यात आता शिंदे यांच्या रुपाने हे चौथं सर्वात मोठं बंड झालं आहे. मधल्या काळात छगन भुजबळ, नारायण राणे यांचं बंड झालं. पण त्यांच्यासोबत फार आमदार गेले नाहीत. तर, राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या कोणत्याही खासदार आणि आमदारांना सोबत येण्यास मनाई केली होती. त्याआधी गणेश नाईक यांचंही बंड झालं. पण ते एकट्याचं बंड ठरलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी 21 जून रोजी बंड केलं. आधी 13 आमदारांना घेऊन ते सुरतला गेले. एक दिवस सुरतमध्ये मुक्काम केल्यानंतर सर्व आमदारांना घेऊन ते गुवाहाटीला गेले. आज चार दिवस उलटले असून शिंदे यांच्याकडे 50 हून अधिक आमदार एकवटले आहेत. पवारांच्या पहिल्या बंडात आणि शिंदे यांच्या बंडात एक फरक आहे. पवारांनी बंड केलं तेव्हा त्यांच्यासह त्यांच्यासोबतच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले होते. त्यांनी परतीचे दोर कापले होते. तर शिंदेंनी अजूनही मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. त्यांच्यासोबतच्या मंत्र्यांनीही राजीनामा दिला नाही. त्यामुळे शिंदे परत येऊ शकतात. वाटाघाटी होऊ शकतात, असं चित्रं आहे. मात्र, शिंदे बंडावर ठाम राहिल्यास इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यताही आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें