Nitesh Rane : राज्यपालांनी मराठी माणसाचा अपमान केल्याचं बिलकूल वाटत नाही; नितेश राणेंकडून समर्थन

Nitesh Rane : जे लोकं बोलत आहेत. मला एक सांगा त्यांना जेव्हा पालिकेचे कंत्राट द्यायचे होते तेव्हा यांना शहा आणि अग्रवाल दिसतात. यांच्या पक्षप्रमुखांना जेव्हा मॉल बांधायचे असतात तेव्हा चंपक जैन आणि इतर भेटतात. पैसे ठेवायचे असतात तेव्हा नंदकिशोर चतुर्वेदी दिसतात.

Nitesh Rane : राज्यपालांनी मराठी माणसाचा अपमान केल्याचं बिलकूल वाटत नाही; नितेश राणेंकडून समर्थन
नितेश राणे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2022 | 10:41 AM

मुंबई: गुजराती आणि राजस्थानी लोकांना वगळलं तर मुंबई (mumbai) आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  (bhagat singh koshyari) यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या या विधावरून सर्वच राजकीय पक्षांनी टीकास्त्र सोडलेलं असतानाच भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी राज्यपालांचं समर्थन केलं आहे. मी त्या कार्यक्रमात होतो. राज्यपाल काहीच वावगं बोलले नाही. त्यांनी मुंबईच्या उत्कर्षात योगदान देणाऱ्या त्या त्या समाजाची आठवण करून दिली. राज्यपालांनी कुणाचा अपमान केला असता तर आम्ही बोललो असतो. त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला बिलकूल वाटत नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

मी त्या कार्यक्रमात होतो. राज्यपालांनी कोणाचा अपमान केलाय? हा प्रश्न मला विचारायचा आहे. ज्या ज्या समाजाने इथे योगदान दिलं त्याची केवळ राज्यपालांनी आठवण करून दिली. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला वाटत नाही. मी तिथे होतो, असं नितेश राणे म्हणाले.

तर आम्ही बोललो असतो

जे लोकं बोलत आहेत. मला एक सांगा त्यांना जेव्हा पालिकेचे कंत्राट द्यायचे होते तेव्हा यांना शहा आणि अग्रवाल दिसतात. यांच्या पक्षप्रमुखांना जेव्हा मॉल बांधायचे असतात तेव्हा चंपक जैन आणि इतर भेटतात. पैसे ठेवायचे असतात तेव्हा नंदकिशोर चतुर्वेदी दिसतात. आदित्य ठाकरेंना जेव्हा कोविडचे कंत्राट द्यायचे असते तेव्हा अन्य दिसतात. पार्टनर करायचे असतात तेव्हा डिनो मोरिया दिसतो. तुम्हाला एकही मराठी माणूस दिसत नाही? तेव्हा मराठी माणसाला श्रीमंत केलं पाहिजे असं वाटत नाही? उगाच कशाला बोंबलत आहात. जे सत्य आहे ते समोर येऊ द्या ना. राज्यपालांनी कुणाचा अपमान केला असता तर आम्ही बोललो असतो. त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला बिलकूल वाटत नाही, असं ते म्हणाले.

नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहेत?

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोनो ऐकला. बारामतीत त्यांची डेअरी चालवणारे गोयंका आणि बलवा आहेत. तिथे का मराठी माणूस नाही. का? असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीला केला. नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहेत? तुमच्यावर राग नाही. तुमची चूक नाही. तुम्हाला नाईलाजाने बोलावे लागते, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना लगावला.

मराठी माणूस आठवला नाही?

राज्यपालांविरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना महापालिकेचे कंत्राट दिले? तेव्हा तुम्हाला शहा आणि अग्रवाल पाहिजे असतात. एवढेच कशाला, तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही?, असा सवालही त्यांनी केला.