योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय

| Updated on: Apr 20, 2020 | 5:00 PM

वडिलांचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा आहे, पण 'कोरोना'च्या साथीमुळे ते अशक्य होत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी आईला भावनिक पत्र लिहित कळवलं (Yogi Adityanath Father Demise)

योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांची प्राणज्योत मालवली. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत वडिलांच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय आदित्यनाथ यांनी घेतला. आईला भावनिक पत्र लिहित आदित्यनाथ यांनी आपला निर्णय कळवला. (Yogi Adityanath Father Demise)

योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांनी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये आज (सोमवार 20 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूची दु:खद बातमी समजली, तेव्हाही योगी कोरोनासंदर्भात एका महत्त्वाच्या बैठकीत होते. निरोप मिळाल्यानंतरही त्यांनी बैठक सुरुच ठेवली.

काही अधिकाऱ्यांनी योगी यांना वडिलांच्या अंत्यसंस्कारांना जाता यावे, यासाठी तयारी सुरु केली. मात्र त्यांनी आपण दिल्ली किंवा उत्तराखंडला जाणार नसल्याचे सांगितले.

आनंदसिंग बिष्ट हे बर्‍याच दिवसांपासून यकृताच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स’मध्ये उपचार सुरु होते. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले, मात्र आज सकाळी 10:44 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आदित्यनाथ यांचे आईला पत्र

वडिलांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा आहे. पण ‘कोरोना’च्या साथीमुळे ते अशक्य होत आहे. प्रामाणिकपणा, मेहनत आणि निस्वार्थ तसेच समर्पण वृत्तीने कार्य करण्याची शिकवण त्यांनी मला बालपणी दिली. उत्तर प्रदेशच्या 23 कोटी जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. लॉकडाऊन यशस्वी करणे आणि कोरोनाचा पराभव करण्याच्या दृष्टीने मला अंत्यविधीला येणे शक्य होणार नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी लिहिले आहे.

आई आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना विनंती आहे, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करुन कमीत कमी व्यक्तींनी अंतिम संस्कारात सहभागी व्हावे. पूजनीय वडिलांच्या स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम करत विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. लॉकडाऊननंतर दर्शनासाठी येईन.’ असं पत्र योगी आदित्यनाथ यांनी आईला लिहिले आहे.