महाआघाडीत जायचं की नको? या सहा मुद्द्यांवर मनसे अजूनही संभ्रमात

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपची युती झाली, जागा वाटपही त्यांनी करून घेतलं. पण आता मनसे कोणासोबत हे अजूनही स्पष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर मनसेकडून महाआघाडीत जाण्यासाठी प्रतिसाद मिळेल, असं वाटलं होतं. पण तसा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. अजून मनसेचं तळ्यामळ्यात सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. …

महाआघाडीत जायचं की नको? या सहा मुद्द्यांवर मनसे अजूनही संभ्रमात

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपची युती झाली, जागा वाटपही त्यांनी करून घेतलं. पण आता मनसे कोणासोबत हे अजूनही स्पष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर मनसेकडून महाआघाडीत जाण्यासाठी प्रतिसाद मिळेल, असं वाटलं होतं. पण तसा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. अजून मनसेचं तळ्यामळ्यात सुरू असलेलं पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा जाहीर होईल. युती आणि आघाडीतील पक्षांनी आपापली रणनीती आखली आहे. पण मनसे मात्र सर्व गोष्टीत अजून मागे आहे. आघाडीत जायचं की नाही, किती जागा लढायच्या यावरच मनसेचं घोडं अजून अडलेलं पाहायला मिळत आहे. राज्यातील मनसेचं प्राबल्य पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा सध्या कोणतेही पत्ते उघडे करताना दिसत नाहीत.

मनसेच्या संभ्रमाचे मुद्दे काय आहेत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांची भेट झाली खरी पण आघाडीत जाणार का हे नक्की नाही.

मनसेला राष्ट्रवादी आघाडीत घेणार, पण काँग्रेस घेणार का हे अजून स्पष्ट नाही.

मनसे आघाडीत आली तर किती जागा दिल्या जाणार आणि कोणत्या हे ही स्पष्ट नाही.

आघाडीत जाऊन दोन जागा लढायच्या की एकटं राहून जास्त जागा लढायच्या यावरही मनसेत अजून एकमत होत नाही.

आघाडीत जाऊन फक्त दोन जागा लढून पक्षात उभारी येणं अशक्य असल्याचं काही नेत्यांचं मत आहे.

मनसेला राष्ट्रवादी कल्याण लोकसभा मतदारसंघ सोडू शकते, पण मनसेला फक्त जागा लढायची नाही. मनसेला मात्र अधिक जागेची अपेक्षा आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून पुणे, कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे निवडणुकीबाबत घोषणा ही पुढील आठवड्यात होऊ शकते. पण निवडणुकीबाबत सर्व तयारी सुरू आहे असं मनसे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. असं असलं तरी मनसे नेते सुद्धा साहेब काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. मनसे नेतेही संभ्रम अवस्थेत असलेले पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला साथ देत आहे हे जरी खरं असलं तर राष्ट्रवादीच्या अंतर्गत नेते मात्र याला विरोध करत आहेत. मनसेला मुंबईत जागा देण्यात येऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी घेतली आहे. मनसे सोबत आली किंवा नाही तरी फायदा आघाडीला होईल, असं अहिर म्हणाले. मनसे हा पक्ष मराठी मताचं प्राबल्य म्हणून किंगमेकर ठरण्याइतकी परिस्थिती सध्या तरी नाही. मनसेने आघाडीसोबत जाणं योग्य ठरणार आहे. एक-दोन जागा लढून पक्षात थोडीशी उभारी येईल याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला होऊ शकतो, असं विश्लेषकांचं मत आहे. पण आता राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *