Amy Jackson | नव्या लूकची तुलना सिलियन मर्फीशी करणाऱ्यांना ॲमी जॅक्सनचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री ॲमी जॅक्सनला तिच्या नव्या लूकमुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या ट्रोलिंगवर आता तिने मौन सोडलं आहे. ॲमीने प्लास्टिक सर्जरी केली का, असाही सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. ॲमीने तिच्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Amy Jackson | नव्या लूकची तुलना सिलियन मर्फीशी करणाऱ्यांना ॲमी जॅक्सनचं सडेतोड उत्तर
Amy Jackson and Cillian Murphy
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 26, 2023 | 12:16 PM

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री ॲमी जॅक्सन गेल्या काही दिवसांपासून तिच्या नव्या लूकमध्ये सतत चर्चेत आहे. या लूकमध्ये तिला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केलं. सोशल मीडियावर ॲमीच्या नव्या लूकची तुलना प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीशी होत आहे. ॲमी आणि सिलियन यांचे फोटो एकत्र करून ते मीम्सच्या रुपात शेअर केले जात आहेत. सतत होणाऱ्या या ट्रोलिंगवर आता खुद्द ॲमीने मौन सोडलं आहे. या ट्रोलिंगला तिने ‘अत्यंत वाईट’ असं म्हटलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या नव्या लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर मौन सोडलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ॲमी म्हणाली, “मी एक अभिनेत्री आणि मी माझ्या कामाकडे फार गांभीर्याने पाहते. गेल्या महिन्यापासून मी युकेमध्ये एका नव्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करतेय. मी जी भूमिका साकारतेय, त्यासाठी मला वजन कमी करावं लागलं होतं. मी स्वत:ला पूर्णपणे त्या भूमिकेसाठी समर्पित केलं होतं. मात्र त्यावरून होणारी ट्रोलिंग ही अत्यंत वाईट आहे. मी अशा अनेक पुरुष कलाकारांसोबत काम केलं आहे, ज्यांना एका चित्रपटासाठी पूर्णपणे आपल्या लूकला बदलावं लागतं. मात्र अशा अभिनेत्यांचं कौतुकच होतं. तीच गोष्ट जेव्हा एखादी अभिनेत्री करते किंवा जेव्हा अभिनेत्री नेहमीपेक्षा वेगळ्या हेअरस्टाइल आणि मेकअपमध्ये दिसते, तेव्हा तिच्या सौंदर्यासाठी ते योग्य मानलं जात नाही. त्यामुळे लोकांना असं वाटतं की तुम्हाला ट्रोल करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे.”

यावेळी अभिनेता सिलियन मर्फीशी तुलना करण्याबद्दलही ॲमी व्यक्त झाली. ती पुढे म्हणाली, “मी फार खुश आहे. त्याने स्वत:ला तसं घडवलंय. त्या पिकी ब्लाइंडर्समधील भूमिकेच्या सीक्वेलसाठी मी स्वत:ला तयार करेन. फ्लॅट कॅप आणि बर्मी (बर्मिंघम) पद्धतीने बोलण्याची तयारी करेन.”

ॲमी जॅक्सनने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन लूकचा फोटो पोस्ट केला होता. यामध्ये ती अत्यंत वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाली होती. तिला या फोटोत ओळखणंही कठीण जात होतं. सोशल मीडियावर ॲमीचा हा नवीन लूक चांगलाच व्हायरल झाला होता. ॲमी नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते, मात्र तिचा हा नवीन लूक पाहून अनेक जण नाराज झाले होते. ॲमीच्या लूकमधील हा बदल पाहून तिने प्लास्टिक सर्जरी केली का असाही प्रश्न अनेकांना पडला होता.