Shiv Sena : शिवसेना नक्की कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?; पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

| Updated on: Jul 20, 2022 | 7:12 PM

Shiv Sena : शिंदे गटाने व्हीप झुगारला आहे. ते दहाव्या अनुसूचीला धरून नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्यांचा गट कोणत्याही पक्षात विलीन झाला नाही. त्यांचा गट कोणत्याही पक्षात विलीन करण्याचा त्यांच्यासमोर पर्याय आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

Shiv Sena : शिवसेना नक्की कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?; पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...
पृथ्वीराज चव्हाण
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेत (shivsena) आमदारांपाठोपाठ खासदारांनीही बंड केलं आहे. त्यातच बंडखोरांनी आता पक्षावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाने तर आज निवडणूक आयोगाला एक पत्र देऊन थेट शिवसेनेवर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिवसेना आपलीच असल्याची असल्याचं दाखवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रं घेतली जात आहेत. शिंदे गटानेही प्रतिज्ञापत्रं घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची यावर चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना कुणाची हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातूनच स्पष्ट होणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर बोलताना जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगितलं आहे. पण त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. शिंदे गटाला पार्टीत पूर्ण फूट पडल्याचं दाखवावं लागेल. तोच मुद्दा कोर्टाच्या निरीक्षणात पुढे येईल. सर्व गोष्टी या कोर्टाकडूनच स्पष्ट होतील. शिवसेना नक्की कोणाची हा मुद्दा कोर्टाच्या माध्यमातून निकाली निघू शकेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणात अनेक संवैधानिक गोष्टी असल्याने हे प्रकरण लार्जर बेंचकडे देण्याचं सूतोवाच केलं. तसेच या प्रकरणावरील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी ठेवली. दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. तर शिंदे गटाच्यावतीने हरीश साळवे आणि महेश जेठमलानी यांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

युक्तिवाद काय?

शिंदे गटाने व्हीप झुगारला आहे. ते दहाव्या अनुसूचीला धरून नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्यांचा गट कोणत्याही पक्षात विलीन झाला नाही. त्यांचा गट कोणत्याही पक्षात विलीन करण्याचा त्यांच्यासमोर पर्याय आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

तर दहावी अनुसूची पक्षांतर्गत लोकशाहीचा गळा घोटत नाही. लक्ष्मण रेषा न ओलांडता पक्षाच्या अंतर्गत आवाज उठवणं म्हणजे पक्षांतर होत नाही, असा दावा हरीश साळवे यांनी केला. यावेळी त्यांनी पॅरा 3 पाहण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं. हा मुद्दा पॅरा दोनपर्यंतच मर्यादीत आहे. त्यामुळे वर्तमान परिस्थितीला तो लागू होत नाही, असं साळवे म्हणाले.