Sharad Pawar : राष्ट्रपती राजवट ते मंत्र्यांचे राजीनामे, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

| Updated on: Jun 26, 2022 | 8:04 PM

शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून आलेल्या वक्तव्यांवरुन त्यांना सत्तापरिवर्तन हवे हे स्पष्ट झाले आहे, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar : राष्ट्रपती राजवट ते मंत्र्यांचे राजीनामे, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
खा. शरद पवार
Image Credit source: ani
Follow us on

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ सुरु आहे. शिवसेनेचे एक गट पक्षातून फुटला असला तरी शिवसेनेचे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे निक्षूण सांगितले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सध्या राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून आलेल्या वक्तव्यांवरुन त्यांना सत्तापरिवर्तन हवे हे स्पष्ट झाले आहे, असे पवार म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील अनेक राजकीय मुद्द्यांवर शरद पवारांनी भाष्य केले.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे पुढीलप्रमाणे

1. महाराष्ट्रातील स्थिती कशी सुधारता येईल याचा निर्णय आम्हाला तिथे घ्यायचा आहे. मी वक्तव्य पाहिली. शिवसेनेचा एक ग्रुप आसाममध्ये गेलाय. त्यांच्याकडून काही वक्तव्य आली आहेत, त्यातून हे स्पष्ट होतं की त्यांना सत्तापरिवर्तन हवं आहे. शिवसेनेची ही खात्री आहे की, गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत मदत होईल. त्यांना मदत करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी असतील. आमच्या भूमिका आघाडीच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याच्या आहेत आणि आम्ही त्यांना साथ देऊ.

2. बंडखोरांना या ठिकाणी पर्यायी सरकार आणायचं आहे.एवढ्या मेहनतीने त्यांनी लोक इथून तिथे नेलं, त्यात त्यांना यश कसे येईल. माझा अंदाज असा आहे की, खात्रीशीर माहिती नाही. राष्ट्रपती राजवटीची शक्यता वाटत नाही. पण राष्ट्रपती राजवट लागली तर निवडणुका होतील.

हे सुद्धा वाचा

3. सरकार बनलं तेव्हा लोक अडीच महिने चालेल सहा महिने चालेल असं सांगितलं जात होतं. पण आम्ही अडीच वर्ष पूर्ण केली. अजुनही सरकार चाललं पाहिजे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही पार पाडत आहोत. पाहू आमदार आल्यावर अंदाज येईल.

4. बंडखोरांनी विधान केलं होतं की, आम्ही राष्ट्रवादीवरून नाराज आहे. त्यामुळे राऊतांनी विधान केलं. महाआघाडीतून बाहेर पडतो परत या, असं राऊत म्हणून बोलले असतील. गुवाहाटीला जाऊन मला बरीच वर्ष झाली आहेत. तिकडे काय चांगलं आहे, काय जादू आहे हे मला माहीत नाही.

5. बंडखोरांवर कारवाई करायची की नाही हे उद्धव ठाकरेंवर निर्भर आहे. आम्ही त्यांना अधिकार दिला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज किंवा उद्या आमच्या आघाडीकडून उपसभापतींना काही विनंती केली जाणार आहे. त्यामुळे काही सक्तीचे निर्णय घेतले जाणार आहेत. मला डिटेल माहीत नाही. पण 16 जणांना नोटिस दिल्याचं मी ऐकलं आहे.

6. मॅच फिक्सिंग असेल तर कशासाठी आम्ही एवढी चर्चा केली असती. शिवसेना कशासाठी मेहनत करत आहे. आज मुंबईत शिवसेनेचे आक्रमकपणे मेळावे का होत आहेत. चार ठिकाणी मोठे मेळावे होत आहेत. अनेक जिल्ह्यात मेळावे होत आहेत कशासाठी ? असा सवाल पवारांनी केला.

7. आमदार घेऊन जाण्यासाठी जी राज्ये निवडली गुजरात आणि आसाम. तिथे सत्ता कुणाची आहे, भाजपची. भाजप यात कुठपर्यंत आहे हे मला माहीत नाही. पण ग्राऊंड लेव्हला स्पोर्ट मिळतोय ते पाहून त्यांचा संबंध असू शकतो. एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे, असं शिंदे म्हणाले. माझ्याकडे राष्ट्रीय पार्टीची यादी आहे. त्यात राष्ट्रवादी सीपीएम, सीपीएम आणि तृणमूलचा शिंदेंना पाठिंबा नाही. मग राष्ट्रीय पक्ष कोणता उरला.

8. ते नंबर असल्याचं सांगत आहे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे तर मग ते तिकडे का बसले आहेत, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. संख्याबळ आहे तर मुंबईत येऊन राज्यपालांकडे दावा का करत नाही ? अडीच वर्ष ते आमच्यासोबत होते, राष्ट्रवादीसोबत होते. अडीच वर्षात राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही. आता का झाला आहे ? हे केवळ स्वतःला डिफेन्ड करण्यासाठी कारण आहे.

9. उद्धव ठाकरेंनी कामातून संबंधातून पक्षाच्या चौकटीतून आमदारांशी संबंध ठेवले. पण त्यापेक्षाही आकर्षक गोष्टीचं प्रलोभन या आमदारांना दिलं असावं. त्यामुळे ते बळी पडले. मला जी शिवसेना माहीत आहे, ती शिवसेना शिवसैनिक या गोष्टी कधी डायजेस्ट करणार नाही. त्यांच्यात प्रचंड ताकद आहे. संघटनेसाठी पडेल ते कष्ट घेण्याची ताकद आहे. काही चाळीस एक लोकांनी वेगळी भूमिका घेतली असेल तरी शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही. मला वाटतं यात उद्धव ठाकरेंचा अखेरीस विजय होईल.

10. लोकांना असं वाटतं जो व्हीप दिला, तो हाऊसमध्ये व्हायलेट केला तर पक्षांतरबंदी कायद्यात येतो. व्हीप दिल्यानंतर हाऊसमध्ये त्याचा भंग केला तरच त्यांच्यावर कारवाई होते असं आम्हाला वाटत होतं. पण सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला आहे. आमदारांनी विधानसभा किंवा संसदेच्या बाहेर पक्षाच्या विरोधात स्टेटमेंट दिलं किंवा पाऊल उचललं तर त्यांनाही व्हीप लागू होतो. या लाईनवर शिवसेना जाईल. मी सांगतो तसा निर्णय व्यंकय्या नायडूंनी घेतला आणि कोर्टाने मान्य केला.