
सध्या ओटीटीचा जमाना असल्याने दर आठवड्याला आणि महिन्याला कोणकोणते नवीन चित्रपट ऑनलाइन स्ट्रीम होणार आहेत, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. सप्टेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये स्टार डेब्युपासून अॅक्शन थ्रिलरपर्यंत अनेक प्रकारांचा समावेश आहे. म्हणजेच थिएटरमध्ये पाहू न शकलेले ब्लॉकबस्टर चित्रपट या महिन्यात प्रेक्षक त्यांच्या घरबसल्या पाहू शकणार आहेत. यात पाच मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे.
सैयारा– मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेता अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली असून 2025 या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. अहान आणि अनीतची फ्रेश जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि त्यातील गाणीसुद्धा हिट ठरली आहेत. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येत्या 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
मालिक- या चित्रपटाचं दिग्दर्शन पुलकितने केलं असून कुमार तौरानी आणि जय शेवक्रमणी हे त्याचे निर्माते आहेत. या अॅक्शन थ्रिलरमध्ये राजकुमार राव, प्रोसेनजीत चॅटर्जी आणि मानुषी छिल्लर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने थिएटरमध्ये विशेष कामगिरी केली नाही. परंतु ओटीटीवर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी हा चित्रपट अॅमझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.
आंखों की गुस्ताखियाँ- या रोमँटिक ड्रामामध्ये विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहे. संजय कपूरची मुलगी शनायाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. संतोष सिंह दिग्दर्शित या चित्रपटालाही थिएटरमध्ये अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता 5 सप्टेंबरपासून झी5 वर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
इन्स्पेक्टर झेंडे- मराठमोठा अभिनेता चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित आणि लिखित या कॉमेडी थ्रिलरमध्ये मनोज बाजपेयीने इन्स्पेक्टर मधुकर झेंडेची भूमिका साकारली आहे. तर जिम सर्भ कार्ल भोजरातच्या भूमिकेत आहे. कुख्यात सीरिअल किलर चार्ल्स शोभराजवर आधारित ही भूमिका आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
कुली- लोकेश कनगराज लिखित आणि दिग्दर्शित ‘कुली’ या चित्रपटात साऊथ सुपरस्टार रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये नागार्जुन, श्रुती हासन, सौबिन शाहिर, सत्यराज, उपेंद्र आणि रचिता राम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर आमिर खान आणि पूजा हेगडे यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले आहेत. येत्या 11 सप्टेंबर रोजी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.