महाराष्ट्रात इंडिया आघाडी अव्वल, शरद पवार यांनी दिला मोठा इशारा
महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल येथे इंडिया आघाडीला यश मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आलीय. यामुळे कॉंग्रेसच्या गोटात आनंद पसरला आहे. मात्र, या सर्वेक्षणावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे भाष्य केलंय.
पुणे | 25 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ भाजप विरोधात इंडिया आघाडीने मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्ष मोठ्या तयारीने कामाला लागले आहेत. अशातच सी व्होटरचा सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे. यामध्ये काही राज्यात भाजप तर महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल येथे इंडिया आघाडीला यश मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आलीय. यामुळे कॉंग्रेसच्या गोटात आनंद पसरला आहे. मात्र, या सर्वेक्षणावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे भाष्य केलंय. यासाठी त्यांनी नुकत्याच पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकांचा दाखला दिलाय.
सी व्होटरचा सर्वेक्षण अहवालमधून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. भाजप प्रणीत एनडीएला 19 ते 21 तर, महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दुसरीकडे नुकत्याच विधानसभा निवडणूक झालेल्या पाच राज्यात लोकसभा निवडणुकीत काय परिणाम दिसतील याचाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मोझोरम या पाच राज्यात विधानसभा निवडणूक झाल्या होत्या. या पाच राज्यापैकी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे हा सर्व्हे सांगत आहे. तर, तेलंगणामध्ये कॉंग्रेस आणि मोझोरममध्ये मिझो पक्षाला यश मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचेच वर्चस्व कायम रहाणार असे या सर्व्हेतून समोर आले आहे. बॅनर्जी यांच्या टीमसीला 23 ते 25 जागा तर भाजपला 16 ते 18 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु, कॉंग्रेच्या ताब्यात असलेल्या कर्नाटकमध्ये भाजप पुन्हा वरचढ होतं दिसत आहे.
पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक दरम्यान सी व्होटरचा सर्वेक्षण अहवाल समोर आला होता. त्यावेळी राजस्थान, मध्यप्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये कॉंग्रेसची जादू चालेल. निवडणुकीनंतर कॉंग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष म्हणून या चार राज्यात पुढे येईल असा अंदाज देण्यात आला होता. तर, मतदानानंतर आलेल्या सर्वेक्षण अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यावेळीही कॉंग्रसला जास्त मतदान झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, मतदान निकालाच्या दिवशी हे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात बहुमत मिळाले. तर कॉंग्रसच्या ताब्यात तेलंगणा राज्य आले.
आताही महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतील कॉंग्रेस आणि ममता बॅनर्जी यांना यश मिळेल, सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक मोठे विधान केलंय. असे सर्व्हे नेहमी येत असतात. अनेक वेळा ते खरे असतात तर अनेक वेळा खोटे असतात. आता ज्या निवडणुका झाल्या त्याचे सर्व्हे काही वेगळे सांगत होते. पण, निकाल वेगळा लागला. लोकांनी वेगळा निर्णय दिला. त्यामुळे अशा सर्व्हेवर अवलंबून राहून कुणी काही निष्कर्ष काढू नये असे शरद पवार म्हणाले.