पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशींच्या मुलाला दहावीत मिळाले इतके टक्के

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या हेमंत जोशी यांनी आपले प्राण गमावले होते. त्यांचा मुलगा ध्रुव जोशीचा दहावीचा निकाल लागला असून त्यात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु मुलाचं हे यश पाहण्यासाठी वडील जिवंत नसल्याचं दु:ख कुटुंबीयांनी व्यक्त केलं.

पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशींच्या मुलाला दहावीत मिळाले इतके टक्के
पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेले हेमंत जोशी आणि त्यांचे कुटुंबीय
Image Credit source: ANI
| Updated on: May 15, 2025 | 12:42 PM

काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले होते. त्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचाही समावेश होता. मुलगा ध्रुवच्या दहावीच्या परीक्षेनंतर हेमंत त्यांच्या कुटुंबीयांसोबत काश्मीरला फिरायला गेले होते. नुकताच दहावीचा निकाल लागला असून त्यात ध्रुवला 80 टक्के गुण मिळाले आहेत. मुलाने दहावीत इतकं चांगलं यश मिळवल्याचं पहायला त्याचे वडील आज जिवंत नसल्याचं दु:ख ध्रुवच्या आईने आणि नातेवाईकांनी व्यक्त केलं. ध्रुवच्या निकालाबद्दल नातेवाईक राजेश कदम म्हणाले, “ध्रुव हा ओमकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने दहावीत इतके चांगले गुण मिळवले आहेत. पण त्याच्या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी आज त्याचे वडील सोबत नाहीत, याचं आम्हा सर्वांना फार दु:ख वाटतंय.” ध्रुवला सायन्स शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा असून त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे.

22 एप्रिल रोजी डोंबिवलीत राहणारे हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांनी पहलगाम हल्ल्यात आपला जीव गमावला होता. दहशतवाद्यांनी त्यांना कुटुंबीयांसमोरच धर्म विचारून गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी ध्रुवसुद्धा घटनास्थळी उपस्थित होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेलेला एक गोळी स्पर्श करून गेली. यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांचे कौटुंबिक संबंध होते. घडलेल्या घटनेचा साक्षीदार ठरलेल्या हर्षलने सांगितलं होतं की “दहशतवाद्यांनी त्यांच्या कपाळावर कॅमेरे लावलेले होते. माझे मामा हेमंत जोशी यांनी त्यांच्यासमोर विनंती केली की आम्ही काहीच केलं नाही, आम्हाला जाऊ द्या. परंतु तरीही त्यांनी गोळी झाडली. नंतर माझ्या वडिलांच्या डोक्यावरही त्यांनी गोळी झाडली. मी त्यांच्या डोक्याला धरून बसलो होतो. एक गोळी माझ्या हातालाही स्पर्शून गेली. हिंदू आणि मुस्लीम वेगवेगळे उभे राहा, असं दहशतवादी ओरडत होते.”

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जात आहे. यानंतर पाकिस्तानकडूनही भारताच्या सीमेवरील राज्यांमध्ये ड्रोन हल्ले झाले. या सर्व हल्ल्यांना भारतीय सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिलं. चार-पाच दिवसांच्या तणावानंतर भारत-पाकिस्तानकडून शस्त्रसंधी घोषित करण्यात आली आहे.