Bihar Politics : ‘जो विकला जातो त्याला खरेदी करा हेच भाजपचं काम’, तेजस्वी यादवांचा हल्लाबोल, तर ‘आम्ही काका-पुतणे…’, JDU-RJD आघाडीवर प्रतिक्रिया

बिहारचं हित पाहून नितीश कुमार यांनी चांगला निर्णय घेतलाय. भाजपचा बिहारमध्ये कोणताही अजेंडा नाही. जो अजेंडा घेऊन ते जाऊ इच्छितात, तो आम्ही चालू देणार नाही. नड्डाजी विरोधकांना संपवू इच्छितात, आता देशात हेच होणार का? असा थेट सवाल तेजस्वी यादव यांनी केलाय.

Bihar Politics : जो विकला जातो त्याला खरेदी करा हेच भाजपचं काम, तेजस्वी यादवांचा हल्लाबोल, तर आम्ही काका-पुतणे..., JDU-RJD आघाडीवर प्रतिक्रिया
नितीश कुमार, तेजस्वी यादव
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 09, 2022 | 8:04 PM

पाटना : बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळतोय. जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार (Nitish Kumar)  यांनी भाजपसोबत काडीमोड घेतलाय. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. इतकंच नाही तर नितीश कुमार आता राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना सोबत घेऊन बिहारमध्ये सत्तास्थापन करत आहेत. त्यांनी 164 आमदारांच्या समर्थनाचं पत्रही राज्यपालांना दिलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. भाजप लोकशाहीला (Democracy) आव्हान देत आहे. आज नितीश कुमार यांनी निर्णय घेतलाय. संपूर्ण देशात काय सुरु आहे माहिती नाही का? झारखंडमध्ये काय सुरु आहे? महाराष्ट्रात काय झालं? बिहारचं हित पाहून नितीश कुमार यांनी चांगला निर्णय घेतलाय. भाजपचा बिहारमध्ये कोणताही अजेंडा नाही. जो अजेंडा घेऊन ते जाऊ इच्छितात, तो आम्ही चालू देणार नाही. नड्डाजी विरोधकांना संपवू इच्छितात, आता देशात हेच होणार का? असा थेट सवाल तेजस्वी यादव यांनी केलाय.

बिहारने देशाला दिशा दाखवली आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला नाही. आज संविधान वाचवायचं आहे. जो विकला जातो त्याला विकत घ्या, हेच भाजपचं काम आहे. मुख्यमंत्र्यांनी देश हिताचा निर्णय घेतलाय. आम्ही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो, अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी भाजपवर हल्ला चढवला. तसंच नितीश कुमार यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत विचारलं असता तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही काका-पुतणे आहोत. आम्ही एकमेकांविरोधात लढलो, आरोप प्रत्यारोप केले. प्रत्येक कुटुंबात वाद होतात. आता दुसरी वेळ आहे. नितीश कुमार देशात सर्वाधिक अनुभवी मुख्यमंत्री आहेत.

‘भाजप प्रादेशिक पक्ष, छोट्या पक्षांना संपवू इच्छिते’

भाजप प्रादेशिक पक्ष, छोट्या पक्षांना संपवू इच्छिते. नड्डाजी बोलले आहेत की विरोधी पक्ष संपतील. आम्ही समाजवादी लोक आहोत, असेच संपणार नाही. पंतप्रधान मोदी केवळ स्वत:चा प्रचार करतात. भाजपचं केवळ एकच काम आहे विरोधी पक्षांना घाबरवा. जागतिक जनगणनेकडे भाजपने डोळेझाक केलीय. भाजपला रोखण्याचं काम पहिल्यांदाच नाही झालं, यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनी अडवाणी यांची रथयात्रा बिहारमध्ये रोखली होती, असंही तेजस्वी यादव यावेळी म्हणाले.

नितीश कुमार, तेजस्वी यादवांकडून सत्तास्थापनेचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांनी 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सोपवलं आहे. राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की 2017 ला आमच्याकडून चूक झाली. तत्पूर्वी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव राजभवनावर दाखल झाले. तिथे त्यांनी राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवलं. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. इतकंच नाही तर माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची हिंदुस्तान आवाम मोर्चा (हम) देखील एनडीएतून बाहेर पडलाय. जीतन राम मांझी हे महाआघाडीला समर्थन देणार आहेत.