काँग्रेस स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, जयंत पाटलांचाही राऊतांच्या सुरात सूर

| Updated on: Jun 17, 2021 | 5:12 PM

सामनामध्ये सगळेच स्वबळावर लढत असतील तर या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र हिताचा विचार करुन एकत्र लढावं लागेल, असं म्हटलंय. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळल्याचं दिसत आहे.

काँग्रेस स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, जयंत पाटलांचाही राऊतांच्या सुरात सूर
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्र आणि जोमाने लढेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला केलं. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल असं पटोले सातत्याने सांगत आहेत. त्यावर आज शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये सगळेच स्वबळावर लढत असतील तर या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र हिताचा विचार करुन एकत्र लढावं लागेल, असं म्हटलंय. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळल्याचं दिसत आहे. (Jayant Patil on Mahavikas Aghadi and Upcoming Assembly elections)

‘महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत. या 3 पक्षांनी एकत्र राहावं याला सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. त्या दृष्टीने सामनाने मत व्यक्त केल्याचं दिसत आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आतापासूनच व्यक्त केली जात आहे. कारण, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी भाजप स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय. तर नाना पटोलेही सातत्याने स्वबळाची भाषा करताना दिसून येत आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा पुनरुच्चार केला आहे. हल्ली राजकीय पक्षांना स्वबळाचं अजीर्ण नक्कीच झालं आहे. भाजप म्हणते आम्ही स्वबळावर लढू. भाजप एकटाच आहे. त्यामुळे स्वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. सरकारमध्ये राहणार पण स्वबळावर लढणार, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. मग राहिले कोण? तर शिवसेना आणि राष्ट्रवादी. हे दोन्ही पक्ष राज्यातील प्रमुख आणि मोठे पक्ष आहेत. आम्ही दोघांनीही स्वबळाची भाषा केली नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असं राऊत म्हणाले.

सामना अग्रलेखात काय म्हटलं होतं?

‘गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ‘स्वबळ’ दाखवण्याची स्पर्धा सुरु आहे. कारणही तसंच आहे, येऊ घातलेल्या निवडणुका… पहिल्यांदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं, त्यात भरीस भर म्हणजे हायकमांडला मान्य असेल तर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार मी होईन, असंही त्यांनी जाहीर केलं. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही भाजप स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं. दोन पक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आता आजच्या सामना अग्रलेखातून महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणाचं भाकित वर्तवण्यात आलंय. “भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष…. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल’, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

2024 चं शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं? कुणाची गोची, कुणाला संधी? काय असू शकतं सत्तेचं गणित? वाचा सविस्तर

VIDEO: शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार

Jayant Patil on Mahavikas Aghadi and Upcoming Assembly elections