अमित शाह-शरद पवारांच्या बहुचर्चित भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Aug 04, 2021 | 10:40 AM

Sanjay Raut | अमित शाह हे सहकार खात्याचे मंत्री आहेत. त्यादृष्टीने शरद पवार यांनी शाहा यांची भेट घेतल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. त्यानंतर या विषयावर अधिक बोलणे संजय राऊत यांनी टाळले.

अमित शाह-शरद पवारांच्या बहुचर्चित भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

नवी दिल्ली: नवनर्वाचित सहकारमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील बहुचर्चित भेटीवर शिवसेनेने सावधपणे प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह हे सहकार खात्याचे मंत्री आहेत. त्यादृष्टीने शरद पवार यांनी शाहा यांची भेट घेतल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. त्यानंतर या विषयावर अधिक बोलणे संजय राऊत यांनी टाळले.

ते बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही केली. अमित शाह राष्ट्रीय आपत्ती निवारणासंबंधीचे निकष बदलण्याचे काम करतील, अशी आशा आम्हाला आहे. आम्ही केंद्र सरकारकडे पॅकेज मागत नाही. पण जेवढी मदत गरजेची आहे, तेवढी दिली जावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

तत्पूर्वी कालची शाह-पवार भेट राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. अमित शहा हे सहकार मंत्री झाल्यानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली. संसदेच्या एका कार्यालयात ही भेट झाली. यावेळी त्यांच्यासोबत नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. ही बैठक सुमारे सव्वा दोन तास चालली. साखरेच्या विक्रीची किंमत, इथेनॉलबाबत येणारं नवं धोरण, सहकार खातं, पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषात करावयाचे बदल आणि महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प बसवण्यासाठी द्यावयाची मंजुरी आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. तसेच राज्यातील पूरपरिस्थितीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

15 दिवसातच दुसरी भेट

यापूर्वी 17 जुलै रोजी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली होती. त्यामुळेही चर्चेचं मोहोळ उठलं होतं. त्यानंतर आज 3 ऑगस्ट रोजी म्हणजे 15 दिवसानंतरच पवारांनी शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मोदी आणि शहा यांची भेट घेण्यामागे काही लिंक आहे का? असा सवालही केला जात आहे. आजच्या भेटीत मोदींसोबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

शरद पवारांच्या दिल्लीतील भेटीगाठी

शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवार हे 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते.  त्यानंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

शरद पवार दिल्लीत कोणाकोणाला भेटले? 

  • संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह
  • वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
  • गृह आणि सहकार मंत्री अमित शाह