IPL 2024 Purple Cap Winner: कोलकात्याच्या वरुण चक्रवर्तीची पर्पल कॅप थोडक्यासाठी हुकली, पर्पल मानकरी ठरला पंजाबचा

IPL 2024 Final Purple Cap Holder : आयपीएल 2024 स्पर्धेत पर्पल कॅपची चुरस रंगतदार वळणावर होती. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यानंतर या कॅपचा मानकरी बदलेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. पर्पल कॅपवर पंजाब किंग्सच्या हर्षल पटेलने मोहोर उमटवली आहे.

IPL 2024 Purple Cap Winner: कोलकात्याच्या वरुण चक्रवर्तीची पर्पल कॅप थोडक्यासाठी हुकली, पर्पल मानकरी ठरला पंजाबचा
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 26, 2024 | 11:42 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. अंतिम फेरीचा सामना कोलकात्याने एकहाती जिंकला. पहिल्या षटकापासून कोलकात्याने या सामन्यावर पकड मिळवली होती. हैदराबादला डोकं वर काढू दिलं नाही. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. साखळी फेरीतील सर्व वाघ अंतिम फेरीत फेल ठरले. एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात 113 धावा केल्या आणि विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान कोलकात्याने 10.3 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. आंद्रे रस्सेलने 3, मिचेल स्टार्कने 2, हर्षित राणाने 2, वैभव अरोराने 1, सुनील नरीनने 1 आणि वरुण चक्रवर्तीने 1 गडी बाद केला. इतके विकेट्स पडल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंना पर्पल कॅप काही मिळवता आली नाही.

हर्षल पटेलने 14 सामन्यात 49 षटकं टाकत 477 धावा दिल्या आमि 24 गडी बाद केले. कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने 14 सामन्यात 50 षटकं टाकतं 402 धावा देत 21 गडी बाद केले. त्याला 3 विकेट्स कमी पडल्या. अंतिम सामन्यात त्याला फक्त एक गडी बाद करता आला. त्यामुळे पर्पल कॅपचा मान हा पंजाब किंग्सच्या हर्षल पटेलला मिळाला. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह 20 विकेटसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन 19 विकेटसह चौथ्या आणि कोलकाता नाईट रायडर्सचा हार्षित राना 19 विकेटसह पाचव्या स्थानी राहिला.

पंजाब किंग्सचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे हर्षल पटेलला मागे टाकण्याची संधी इतर गोलंदाजांकडे होती. मात्र त्यांना यश आलं नाही. दुसरीकडे, ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही कोलकाता आणि हैदराबादचे खेळाडू मागे पडले आहेत. विराट कोहलीला ऑरेंज कॅपचा मान मिळाला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत कोलकाता आणि हैदराबाद हे संघ असताना पर्पल आणि ऑरेंज कॅपचे मानकरी भलतेच ठरले आहेत.