IND vs SA: सुनील गावस्करांची Umran Malik साठी बॅटिंग, ‘तो’ संघात हवाच, कारण…

| Updated on: Jun 14, 2022 | 1:38 PM

विशाखापट्टनम येथे होणाऱ्या तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या (Umran Malik) पारड्यात मत टाकलं आहे.

IND vs SA: सुनील गावस्करांची Umran Malik साठी बॅटिंग, तो संघात हवाच, कारण...
sunil gavaskar-umran malik
Follow us on

मुंबई: विशाखापट्टनम येथे होणाऱ्या तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या (Umran Malik) पारड्यात मत टाकलं आहे. उमरान मलिकला खेळवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. अतिरिक्त वेगवान गोलंदाजामुळे टीम इंडियाची (Team India) सरशी होऊ शकते, असा गावस्कारांचा अंदाज आहे. भारताने पहिले दोन सामने गमावले असले, तरी प्लेइंग 11 मध्ये आपण फार बदल करणार नाही, असं गावस्कर यांनी सांगितलं. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु आहे. उमरान मलिकने विकेट काढण्याची त्याची क्षमता दाखवून दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजामुळे गोलंदाजी अधिक धारदार होईल, असं गावस्कर यांनी म्हटलं आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला आहे.

फक्त तो एकटा प्रभावी

दुसऱ्या टी 20 सामन्यात भुवनेश्वर कुमारने चार विकेट काढल्या. त्याच्या व्यतिरिक्त अन्य दुसरा कुठलाही गोलंदाज प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. आवेश खान आणि हर्षल पटेल गरज असताना संघाला विकेट मिळवून देण्यात अपयशी ठरलेत. 6 वा गोलंदाज म्हणून हार्दिक पटेल अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही.

फिरकी गोलंदाजी ताकत, पण….

मायदेशात खेळताना फिरकी गोलंदाजी भारताची मुख्य ताकत आहे. पण युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल दोघे अपयशी ठरलेत. पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 211 धावांचे अवघड लक्ष्य पार केलं होतं. दुसऱ्या सामन्यात भारताला अवघ्या 148 धावांवर रोखलं होतं.

गावस्कर काय म्हणाले?

“मी उमरान मलिकला संघात घेईन. कारण मागच्या दोन सामन्यात आपण पाहिलं. आपण फक्त त्याचे सात विकेट काढले. त्यामुळे जो गोलंदाज टॉप ऑर्डरला लक्ष्य करेल आणि मधल्या षटकात विकेट मिळवून देईल, अशा गोलंदाजाची गरज आहे” असं सुनील गावस्कर म्हणाले. दुसऱ्या टी 20 सामन्यात पहिल्या 10 षटकात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. पण दुसऱ्या हाफमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी उलटवली. युजवेंद्र चहल-अक्षर पटेल भारताची ताकत ठरण्याऐवजी कमकुवत दुवा ठरतायत.