Kalyan : 30 हजारांचा लेहंगा सुऱ्यानं फाडला, ग्राहकाच्या अजब धमकीने मालकही घाबरला; जसा लेहंगा फाडला तसं… नेमकं काय घडलं?
कल्याणच्या जुन्या आग्रा रोडवरील एका कपड्याच्या दुकानात खळबळजनक प्रकार घडला आहे. मेघना माखीजा या महिलेने ३० हजार रुपये किमतीचा लेहंगा खरेदी केला होता. मात्र नंतर काही कारणास्तव तिने पैसे परत मागितले. दुकानदाराने न दिल्याने ग्राहकाचा गोंधळ पाहायला मिळाला.
कल्याणमधून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये कापड्याच्या दुकानामध्ये ग्राहकाचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. कल्याणच्या जुन्या आग्रा रोडवरील कलाक्षेत्र या दुकानातील हा प्रकार आहे. ३० हजार रुपये किमतीचा लेहंगा परत न घेतल्याच्या कारणावरून संतप्त ग्राहकाने दुकानात येऊन थेट सुरी काढली आणि तो लेहंगा धारदार सुरीने फाडून टाकल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर दुकानदाराला थेट जीवे मारण्याची उघड धमकी दिली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी कल्याणच्या जुन्या आग्रा रोडवरील ‘कलाक्षेत्र लालचौकी डेपो’ या कपड्याच्या दुकानात ग्राहक आणि दुकानदार यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाला.
दुकानदाराने वस्तू परत न घेता कस्टमर क्रेडिट नोट देण्याचे सांगितले. यावरून संतप्त झालेली मेघना माखीजा आणि तिचा होणारा नवरा सुमित सयानी यांनी १९ जुलै रोजी दुकानात जात या महिलेच्या नवऱ्याने खिशातून सुरी काढून त्या लेहंग्यावर वार करून तो फाडला आणि दुकानदाराला धमकी दिली. “हा लेहंगा जसा फाडला, तसंच तुझं आयुष्यही फाडून टाकीन…!”, या घटनेमुळे दुकानदार प्रवीण समातानी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
