‘मी बॉलिवूड शब्दाचा चाहता नाही’ म्हणत अल्लू अर्जुनने ‘छावा’बद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

हैदराबादमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात अल्लू अर्जुनने 'छावा' या चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. त्यामागचं कारणही विशेष आहे. त्याचसोबत मी बॉलिवूड या शब्दाचा चाहता नाही, असं वक्तव्य त्याने केलंय. 'पुष्पा 2'च्या यशानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मी बॉलिवूड शब्दाचा चाहता नाही म्हणत अल्लू अर्जुनने छावाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत
Allu Arjun and Vicky Kaushal
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 10, 2025 | 8:17 AM

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याप्रकरणी त्याला अटक झाली होती आणि त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. जामिन मिळाल्यानंतर तो पहिल्यांदाच एका कार्यक्रमात उपस्थित राहिला. शनिवारी हैदराबादमध्ये ‘पुष्पा 2’च्या यशाबद्दल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अल्लू अर्जुन बॉलिवूडविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याचप्रमाणे विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाच्या टीमचे त्याने आभार मानले.

‘छावा’बद्दल काय म्हणाला अल्लू अर्जुन?

“जेव्हा मी बॉलिवूडमधील, हिंदी चित्रपटसृष्टीतील एका चित्रपट दिग्दर्शकांना फोन केला.. मी बॉलिवूड या शब्दाचा चाहता नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत, मी त्या चित्रपटाशी संबंधित व्यक्तीला फोन केला आणि सांगितलं. कारण त्यांचा चित्रपटसुद्धा 6 डिसेंबरलाच प्रदर्शित होणार होता. ते खूप सहाय्यकारी होते. त्यांनी लगेचच त्यांच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली. मी वैयक्तिकरित्या त्यांना फोन केला आणि तारीख बदलल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “आम्ही सर्व पुष्पाचे चाहते आहोत आणि जर तुम्ही आलात तर आम्ही त्यासाठी मार्ग मोकळा करू.” त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व इंडस्ट्रीजचे मी आभार मानतो,” असं अल्लू अर्जुन म्हणाला.

अल्लू अर्जुनने इथे थेट ‘छावा’चं नाव घेतलं नाही. मात्र 6 डिसेंबर 2024 रोजी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हाच चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. ‘पुष्पा 2’सोबत या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होती. मात्र अल्लू अर्जुनच्या फोननंतर ‘छावा’च्या निर्मात्यांनी तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ‘छावा’ हा चित्रपट आता येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या कार्यक्रमात अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’बद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या. “माझ्यासाठी पुष्पा हा फक्त एक चित्रपट नाही, तर हा पाच वर्षांचा प्रवास आहे, ही भावना आहे. या चित्रपटासाठी घेतलेली सगळी मेहनत आणि त्याला मिळालेलं यश मी माझ्या चाहत्यांना समर्पित करतो. मी वचन देतो की तुम्हाला माझा आणखी अभिमान वाटेल असं काम मी भविष्यात करीन”, असं तो पुढे म्हणाला. ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने जगभरात तब्बल 1800 कोटी रुपयांची कमाई केली आहे.