तुम्ही लोकांसाठी जेवढं करता..; घटस्फोटानंतर माही विजची पोस्ट चर्चेत, जयला मारला टोमणा?
जय भानुशालीसोबत घटस्फोट जाहीर केल्यानंतर माहीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही पोस्ट शेअर केल्या आहेत. माहीच्या या पोस्टवरून नेटकऱ्यांमध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे. रविवारी एकत्र पोस्ट शेअर करत जय आणि माहीने घटस्फोट जाहीर केला होता.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट जाहीर केला आहे. रविवारी इन्स्टा स्टोरीमध्ये एकत्र पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होतीच. अखेर त्यांनी यावर शिक्कामोर्तब केला. घटस्फोट जाहीर केल्याच्या काही तासांनंतर माहीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये आणखी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यावरून तिने जयला टोमणा मारला की काय, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. जय आणि माही यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना राजवीर, खुशी आणि तारा ही तीन मुलं आहेत. राजवीर आणि खुशी यांना त्यांनी दत्तक घेतलंय.
माही विजची पोस्ट-
‘तुम्ही लोकांसाठी जेवढं करता, तेवढचं लोकसुद्धा तुमच्यासाठी करतील असा विचार केला तर तुम्ही खरंच निराश व्हाल’, अशा आशयाची एक पोस्ट माहीने शेअर केली. तर दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘तुम्ही ते कारण बना, ज्यामुळे लोक सुंदर आत्म्यांवर, प्रेमळ हृदयावर आणि चांगल्या ऊर्जेवर विश्वास ठेवतील.’

जय आणि माही यांनी काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तेव्हापासून दोघं वेगवेगळे राहत होते. ‘आयुष्याच्या या प्रवासात आज आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. तरीही आम्ही एकमेकांना साथ देत राहू. शांती, प्रगती, दयाळूपणा आणि माणुसकी ही नेहमीच आमची आयुष्यात मार्गदर्शक मूल्ये राहिली आहेत. आमची मुलं- तारा, खुशी आणि राजवीर यांच्यासाठी आम्ही सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम मित्र बनून राहू. त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते करण्यासाठी आणि जे काही भविष्यात करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
घटस्फोटाबाबत त्यांनी पुढे म्हटलं होतं, ‘जरी आम्ही वेगवेगळा मार्ग निवडला असला तरी या कथेत कोणीच खलनायक नाही आणि या निर्णयाशी कोणतीही नकारात्मकता जोडलेली नाही. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी कृपया हे जाणून घ्या की आम्ही ड्रामापेक्षा शांतता आणि इतर सर्व गोष्टींपेक्षा सामंजस्याला महत्त्व देतो. आम्ही नेहमीप्रमाणे एकमेकांचा आदर करत राहू, एकमेकांना पाठिंबा देत राहू आणि मित्र म्हणून परस्पर आदरासह राहू. आयुष्यात पुढे जात असताना तुमच्याकडून आदर, प्रेम आणि दयाळूपणाची आम्ही अपेक्षा करतोय.’
