महाराष्ट्र भूषण पुरस्काराने अशोक सराफ भारावले, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

| Updated on: Jan 30, 2024 | 9:43 PM

"लक्ष्याने माझ्याबरोबर फक्त सिनेमात काम केलं. त्याने नाटकात कधी काम केलं नाही. पण सिनेमात आमचं दोघांचं टायमिंग जमून आलं. आम्ही दोघांनी एकत्र जवळपास 50 सिनेमे केले असतील. त्यामुळे आमची जोडी इतकी जमलेली होती, टायमिंग जमल्यामुळे रोल खुलून यायचा", असं अशोक सराफ म्हणाले.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने अशोक सराफ भारावले, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
Follow us on

मुंबई | 30 जानेवारी 2024 : ज्येष्ठ अभिनेते शोक सराफ यांना महाराष्ट्र सरकारचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आम्ही त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशोक सराफ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “माझी प्रतिक्रिया तशी संमिश्र आहे. हा पुरस्कार मिळणं हे खरंच मोठी मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण हा पुरस्कार आधी ज्या-ज्या लोकांना मिळाला आहे ती नावे इतकी थोर आहेत की त्यानंतर मला त्या लायनीत नेऊन बसवलं ही माझ्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट झाली आहे. महाराष्ट्राचा भूषण म्हणजे महाराष्ट्राचा नंबर 1 पुरस्कार आहे असं मी समजतो. तो पुरस्कार माझ्याकडे आलाय यापेक्षा जास्त आनंद असूच शकत नाही”, असं अशोक सराफ म्हणाले. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

“मी सतत 50 वर्षे सिनेमा, नाटक आणि सीरियलमध्ये जे काम केलं ते कुठेतरी सत्कारणी लागत आहे. प्रेक्षक आणि सरकारने त्या कामाची दाद घेतली. मला अतिशय मनाला भावून गेलं आहे. मी अतिशय भारावून गेलो आहे. त्यामुळे मी आणखी त्या गोष्टीचा बांधला गेलो आहे की, आपल्याला आणखी काहीतरी वेगळं आणि चांगलं करायचं आहे. त्यामुळे मी सिलेक्टेड काम करतोय. पण मी काम निश्चितच करत राहणार. माझे तुम्ही आहात आणि तुमचा मी आहे, मी तुमच्याशिवाय राहुच शकत नाही. त्यामुळे काम करायलाच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिली.

‘आम्ही दोघांनी एकत्र जवळपास 50 सिनेमे केले’

“खरंतर या लोकांची आठवण येणं साहजिकच आहे. माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं त्यापैकी सचिन पिळगावकर. सचिनसोबत मी 15 ते 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. मी जास्तीत जास्त चित्रपट सचिनसोबत केले. सचिन आणि माझी जोडी एकदम हिट होती. लक्ष्याने माझ्याबरोबर फक्त सिनेमात काम केलं. त्याने नाटकात कधी काम केलं नाही. पण सिनेमात आमचं दोघांचं टायमिंग जमून आलं. आम्ही दोघांनी एकत्र जवळपास 50 सिनेमे केले असतील. त्यामुळे आमची जोडी इतकी जमलेली होती, टायमिंग जमल्यामुळे रोल खुलून यायचा. लक्ष्मीकांत गेल्यानंतर माझी एक बाजू थोडीशी कमी झाली. मला दुसरा माणूस शोधावा लागला किंवा तयार करावा लागला. पण लक्ष्मीकांतच्या वेळेला कधीच कठीण पडलं नाही”, अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

निवेदिताताईंची प्रतिक्रिया काय?

यावेळी त्यांना पत्नी निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर अशोक सराफ यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “मला बरेच फोन आले आहेत. फोन बंद करतो तेवढ्यात फोन वाजतोय. फोन एकामागे एक येतच होते. शेवटी मी तो फोन काही वेळासाठी बंद केला आहे. पण सतत येत आहे. निवेदिताची प्रतिक्रिया सर्वात पहिल्यांदा आली. कारण पहिला फोन तिलाच आला. ती पहिल्यांदा इतक्या मोठ्यात ओरडली, अर्थात तिला माझ्यासाठी हा आनंद होणार हे स्वभाविकच आहे. कारण माझ्या या सगळ्या वाटचालीमध्ये तिचा हाच आहेच. ती माझ्यामागे ठामपणे उभी आहे. मी माझं कामशिवाय दुसरं काही बघूच शकत नाही, अशी परिस्थिती तिने करुन ठेवली आहे. त्यामुळे मला कितीतरी फायदा झाला. माझं लग्न होण्याआधी भावाने सर्व काही सांभाळलं आणि लग्नानंतर तिने सर्व काही सांभाळलं आहे. माझ्या जडणघडणीत तिचं योगदान फार मोठं आहे”, असं अशोक सराफ म्हणाले.