करुणा शर्मा प्रकरणी मोठा ट्विस्ट, गुणरत्न सदावर्ते धनंजय मुंडेंची बाजू लढणार?
फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगीपोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्याप्रकरणी कोर्टाने नक्की काय ऑर्डर दिली, याबद्दल सविस्तर माहिती दिली.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्या कायदेशीर लढाई लढत आहेत. आता करुणा शर्मा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगीपोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्याप्रकरणी कोर्टाने नक्की काय ऑर्डर दिली, याबद्दल सविस्तर माहिती दिली.
‘टीव्ही ९ मराठी’ने नुकतंच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना करुणा शर्मा प्रकरणी कोर्टाने दिलेल्या ऑर्डरबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी याप्रकरणाचे संदर्भासह स्पष्टीकरण दिले. कुणीही निर्णायला स्वत:चे अर्थ लावू नये. मुलामा लावू नये. कोर्टाच्या पुढे कुणी जाऊ नये, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
“निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ”
“केस लढण्याबाबत मी काही बोलणार नाही. हा निकाल अंतरिम आहे. या निकालात ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर आहे. त्यात कुठेही हिंसा केलीय असं म्हटलं नाही. बायको किंवा नवरा आहे, असंही नमूद केलं नाही. या निकालात मेंटेनन्स पोटगी दिलेली आहे. त्यामुळे निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ आहे. हे पहिलं न्यायालय आहे. त्यावर रिव्हिजन आहे. अपील आहे. रिट आहे. नंतर सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे एखाद्या निकालावर खोलात पाय गेला, अडचणी वाढल्या, राजीनामा दिला पाहिजे, हे निकालाचं राजकारणी करण करत आहोत. त्यामुळे या निकालाचे अनेक अर्थ काढू नये”, असे गुणरत्न सदावर्तेंनी सांगितले.
निकालाचं राजकारणीकरण किंवा सामाजीकरण करू नये
“पॉइंट्स आणि फायडिंग हे निकालाचा ऑपरेटिव्ह पार्ट नाही. युक्तिवादाचे मुद्दे आहेत. ते चॅलेंज होत नसतात. ऑर्डर शेवटी आहे. त्यात कोर्टाने अत्याचार केला असं नमूद केलं नाही. यापुढे तुम्ही अत्याचार करू नका, असं म्हटलंय. केलंय असं म्हटलं नाही. ऑब्सर्व्हेशन येतात. पण ते मान्य केलंच पाहिजे असं नाही. कोर्टाच्या निकालाचं राजकारणीकरण किंवा सामाजिकरण करू नये. हे दुखद आहे. कोर्टाच्या पावित्र्याच्या पुढे जाऊन काही सामाजिक कार्यकर्ता वागत आहेत”, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
“कुणीही निर्णायला स्वत:चे अर्थ लावू नये. मुलामा लावू नये. कोर्टाच्या पुढे कुणी जाऊ नये. करुणा शर्मांना निकाल मान्य नसेल तर मग त्याचा अर्थ काय काढायचा? मग निकालावर राजकारण का होतंय?” असा प्रश्न गुणरत्न सदावर्तेंनी उपस्थित केला.
“धनंजय मुंडे पोटगीला स्थगिती मागू शकतात”
“या प्रकरणात मुंडेंच्या बाजूने निकाल लागला तर पोटगीचे पैसे परत द्यावे लागतील. आता कायदा खूप डेव्हल्प झाला आहे. बायकांनी नवऱ्याला पोटगी दिल्याचीही प्रकरणं आहेत. सासू सूनेवर किंवा सून सासूवरही कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते. धनंजय मुंडे हे वरच्या कोर्टात जाऊन पोटगीला स्थगिती मागू शकतात”, असेही गुणरत्न सदावर्तेंनी म्हटले