‘ही तीच शिंग आहेत जी गुवाहाटीला जाताना त्यांनी…’, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना खोचक टोला
शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना फोडण्याचं मोठं पाप राऊत यांनी केल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सातत्यानं भाजप आणि शिवसेनेवर हल्लाबोल करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर अजून राहण्यासाठी का गेले नाहीत ? असा सवाल करतानाच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीसमोर रेडे कापले त्यांची शिंग वर्षा बंगल्याबाहेरील लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत. असा स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर आता गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत सडलेला आंबा आहे. त्यांना शिंदे साहेबांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. शिंगांशिवाय त्यांना काही दिसत नाही. पण ही तीच शिंगं आहेत, ज्यांनी ती गुवाहाटीला जाताना अंगावर घेतली होती. संजय राऊतांनी गंगेत जाऊन स्थान करावं म्हणजे केलेली पाप धुतली जातील. शिवसेना फोडण्याचं मोठं पाप त्यांनी केलं आहे, उद्धवजींना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नेलं, हा कोण भविष्यकार? मुळात संजय राऊत हा वेढा आहे, त्यांना चौकात आणलं पाहिजे, आणि शिवसेना स्टाईलनं सांगितलं पाहिजे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अजूनही महायुतीमधील पालकमंत्रिपदाच्या वाटपाचा तिढा सुटलेला नाही. पालकमंत्रिपदाचं वाटप झालं आहे. मात्र अजूनही काही नेते नाराज आहेत, यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री पदाचा विषय थोडा क्लिष्ठ असला तरी वरिष्ठ नेते तो तिढा आपल्या पातळीवर सोडवतील असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सध्या महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडचं पालकमंत्रिपद हे आदिती तटकरे यांना तर नाशिकचं पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले देखील इच्छूक असल्यानं तिढा वाढला आहे.