मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट, पडताळणीच्या धास्तीमुळे अवघ्या महिन्याभरात…

महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारकडू सध्या या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे, मात्र त्याचीच धास्ती लाडक्या बहिणींच्या मनात आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट, पडताळणीच्या धास्तीमुळे अवघ्या महिन्याभरात...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
| Updated on: Feb 07, 2025 | 8:55 AM

महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यात 5 लाखांनी घट झाली आहे. छाननी प्रक्रिया सुरू असतानाच योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची धाकधूक वाढली असून परिणामी लाखो लाभार्थ्यांमध्ये घट झाल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबर 2024 मध्ये लाभार्थी महिलांची संख्या 2.46 कोटी इतकी होती. मात्र जानेवारी 2025 मध्ये हाच आकडा 2.41 कोटी लाभार्थ्यांवर पोहोचला आहे.

ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ जुलै महिन्यात घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा होतात. जुलै ते जानेवारी अशा 7 महिन्यांचे एकूण 10 हजार 500 रुपये आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2100 करू असं आश्वासनंही महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं. त्यामुळे बहिणींना 2100 चा हप्ता कधी मिळणार असा सवालही अनेक बहीणींच्या मनात होता.

शासनाकडून पडताळणी

मात्र गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आहेत. या योजनेची पडताळणी सुरू झाल्याने राज्यातील अनेक महिलांच्या मनात धास्ती आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यानंतर राज्यातील अनेक महिलांनी अर्ज मागे घेत योजनेचा लाभ नको असल्याचे सांगितलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत शासनाने पात्र महिलांना दीड हजार रुपये महिना खात्यात टाकण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत राज्यातील अडीच कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र, बऱ्याच सधन कुटुंबातील महिलांनीही लाभ घेतला होता. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची शासनाने पडताळणी सुरु केली होती.

या योजनेत अपात्र ठरण्याची भीती महिलांच्या मनात आहे. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, अशी भीतीही महिलांच्या मनात निर्माण झाली त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत महिन्याभरात 5 लाखांची घट झाली. डिसेंबर 2024 मध्ये लाभार्थी महिलांची संख्या 2.46 कोटी इतकी होती. मात्र जानेवारी 2025 मध्ये लआभार्थी महिलांचा आकडा 2.41 कोटीवर पोहोचल्याचे समजते.

चारचाकी असेल तर योजनेतून नाव होणार बाद

राज्यातील लाडक्या बहिणींची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या घरात चारचाकी वाहन असेल त्यांचे अर्ज थेट बाद होणार असून त्यांचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे.   ज्या लाभार्थी महिलांच्या घरात चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न होईल, त्या बहिणींची नावे लाडकी बहीण योजनेतून रद्द करण्यात येणार आहेत. या पडताळणीत जर लाभार्थी महिला एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात राहत असतील आणि पती अथवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. जर त्या महिलेच्या नावावर चारचाकी असल्याचे निष्पन्न झाले तर तिचा लाडकी बहीण योजनेचा लाभ रद्द केला जाणार आहे. यामुळे महिलांची धाकधूक वाढली आहे.