Maharashtra Election News LIVE : संजय राऊत पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला

Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. आता राज्यात अनेक भागात मोठे राजकीय नेते मंडळी प्रचारसभा घेताना दिसतील.

Maharashtra Election News LIVE : संजय राऊत पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला
Maharashtra Municipal Corporation
| Edited By: | Updated on: Dec 31, 2025 | 11:40 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 31 Dec 2025 11:40 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर – भाजप कार्यालयात नाराजी उफाळली, भागवत कराड यांचा निषेध

    छत्रपती संभाजीनगर येथे भाजप कार्यालयात नाराजी उफाळली असून भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत त्यांचा निषेध करण्यात आला. अतुल सावे यांच्या गाडीलाही घेराव घालण्यात आला असून पदाधिकारी प्रचंड आक्रमक झालेत.

  • 31 Dec 2025 11:28 AM (IST)

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-महायुतीच्या विजयाला शुभारंभ.  प्रभाग क्र. 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्र. 26-क मधून आसावरी केदार नवरे यांचा नगरसेविका पदी बिनविरोध विजय झाला. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे दोन्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले….

  • 31 Dec 2025 11:04 AM (IST)

    संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

    संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. संजय राऊत हे शिवतीर्थ येथे दाखल झाले असून ते राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

  • 31 Dec 2025 10:57 AM (IST)

    नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी सज्ज, साईमंदिर रात्रभर उघडे राहणार

    सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीची साईनगरी भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. आपल्या लाडक्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देशभरातील विविध शहरांतून अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. भाविकांचा हा वाढता ओघ लक्षात घेता, साईबाबा संस्थान प्रशासनाने आज साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 31 Dec 2025 10:47 AM (IST)

    अहिल्यानगर मनपा निवडणुकीचा धुराळा: महायुतीत बिघाडी, भाजप-अजित पवार गट एकत्र

    अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ६८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा न सुटल्याने अखेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५४ जागांसह स्वतंत्र रिंगणात उतरली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने मात्र एकीचे बळ दाखवत शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांसोबत मिळून जागावाटप पूर्ण केले आहे. ६८ जागांच्या या रणसंग्रामात आता त्रिकोणी लढत स्पष्ट झाली असून कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • 31 Dec 2025 10:37 AM (IST)

    काय चुकले माझे? तिकीट नाकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची पोस्ट

    भाजपचे माजी नगरसेवक किरण दराडे  यांची एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. “काय चुकले असे की, भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी नाकारली?” अशा भावनिक आशयाचे पोस्टर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे, या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोच्या अगदी शेजारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे घड्याळ हे चिन्ह लावण्यात आले आहे. भाजपतून उमेदवारी नाकारली गेल्याने नाराज झालेल्या दराडे यांनी कालच राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला आहे.

  • 31 Dec 2025 10:28 AM (IST)

    वसई-विरार मनपाचा रणसंग्राम: ११५ जागांसाठी ९४७ उमेदवारांचे अर्ज दाखल

    वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे.  एकूण ११५ जागांसाठी ९४७ उमेदवारांनी ९४९ अर्ज दाखल केले आहेत. २९ प्रभागांमधील या ११५ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत आज सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. तांत्रिक कारणांमुळे कोणाचे अर्ज बाद होतात आणि कोणाचे अर्ज वैध ठरतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागले आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि महायुती यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार असून, या थेट लढतीमुळे वसई-विरारचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

  • 31 Dec 2025 10:17 AM (IST)

    मुंबईत ठिकठिकाणी भरारी पथके तैनात, गिरगाव चौपाटीवर पोलिसांची करडी नजर

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल होताच राज्य निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आला आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर, सोन्याची तस्करी आणि मतदारांना दिल्या जाणाऱ्या प्रलोभनांना आळा घालण्यासाठी मुंबईतील प्रमुख मोक्याच्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके (SST) तैनात करण्यात आली आहेत. विशेषतः गिरगाव चौपाटी परिसरात पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. दर दोन किलोमीटर अंतरावर ही पथके सज्ज आहेत. संशयास्पद हालचाली किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत वाढलेला हा कडेकोट बंदोबस्त सध्या सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून प्रशासनाने आचारसंहितेच्या पालनासाठी कंबर कसली आहे.

  • 31 Dec 2025 10:07 AM (IST)

    नाशिक मनपा निवडणुकीत ऐतिहासिक घडामोड, प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

    नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना समोर आली आहे. सातपूर गोळीबार प्रकरणात गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेले रिपाइं (आठवले गट) माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आता थेट तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत. न्यायालयाच्या विशेष निर्देशानुसार त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सातपूर प्रभाग क्रमांक ११ मधून दाखल केला आहे. नाशिक महापालिकेच्या इतिहासात कारागृहातून निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या घडामोडीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 31 Dec 2025 09:57 AM (IST)

    उमेदवारी न मिळाल्याने अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक नाराज

    उमेदवारी न मिळाल्याने अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक नाराज. तीस वर्षापासून घरात लावलेले अशोकराव चव्हाण यांचे फोटो टाकले काढून. नांदेड महानगरपालिकेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून दाखल केला उमेदवारी अर्ज. आता घरात, कार्यालयात लावणार बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदे यांचे फोटो

  • 31 Dec 2025 09:34 AM (IST)

    सध्या मुंबईला वाचवणं ही प्राथमिकता – सचिन अहिर

    “मुंबईचा महापौर हिंदी भाषिक करण्याची भाजपची चिथावणी. ठाकरे बंधू एकत्र का आले? ते सांगण्याचं काम आम्ही केलय. सध्या मुंबईला वाचवणं ही प्राथमिकता. मुंबईची जनता बघतेय. त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” असं सचिन अहिर म्हणाले.

  • 31 Dec 2025 09:32 AM (IST)

    माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव भाजपाच्या वाटेवर

    माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव भाजपाच्या वाटेवर. वसमत विधानसभेचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव भाजपाच्या वाटेवर. आतिश जयप्रकाश दांडेगावकर भाजपा मध्ये पक्षप्रवेश करणार का?. कपीश्वर शुगर्स अँड केमिकल्स लिमिटेडचे आतिश जयप्रकाश दांडेगावकर अध्यक्ष आहेत.

  • 31 Dec 2025 09:14 AM (IST)

    वर्षाच्या शेवटच्या दिवशीही मुंबईची हवा खराब

    वर्षाच्या शेवटच्या दिवशीही देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हवेची गुणवत्ता खराब आहे. शासकीय APP वर हवा गुणवत्ता निर्देशांक 133 च्या वर दाखवला जातोय तर इतर APP वर हा 265 च्या घरात पोहोचलेला दिसतोय. बीकेसी आणि बांद्रा इथे एक्यूआय 175 पर्यंत पोहोचलाय.

  • 31 Dec 2025 08:50 AM (IST)

    सुरेश वरपूडकर यांच्यावर गंभीर आरोप

    परभणीत भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. शिवसेनेकडून भाजप नेते माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्यामुळे युती होऊ शकली नाही, वरपूडकर यांनी घर गाड्यांसाठी युती तोडली असा थेट आरोप शिवसेनेकडून करण्यात आला,

  • 31 Dec 2025 08:40 AM (IST)

    लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघड

    12,900 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून ऊघड. या योजनेतून वगळण्यात आलेले असतानाही 12,915 सरकारी कर्मचारी दरमहा 1,500 रुपयांचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. या नव्या आकडेवारीनंतर योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे.

     

  • 31 Dec 2025 08:30 AM (IST)

    6 जानेवारीला होणार उपाध्यक्षांची निवड, नगराध्यक्षांनी बोलविली सभा..

    गोंदिया स्थानिक नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला तर 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडली. यात नगराध्यक्षपदी सचिन शेंडे हे निवडून आले. गॅजेटमध्ये त्यांचे नाव आल्यानंतर आता त्यांनी 16 जानेवारीला नगर परिषदेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची सभा न.प.च्या सभागृहात बोलविली आहे.

  • 31 Dec 2025 08:20 AM (IST)

    1 जानेवारीपासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू

    यानुसार काही रेल्वेंच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने जनशताब्दी एक्स्प्रेस, हिंगोली- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस यासह अनेक रेल्वेंच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळांत बदल झाला आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या चौकशी प्रणाली, रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ, स्टेशन चौकशी कार्यालय किंवा स्टेशन मास्टर यांच्याकडून नवीन वेळापत्रकाची माहिती घ्यावी.

  • 31 Dec 2025 08:10 AM (IST)

    महायुती तुटल्यानंतर तीन तासांत भाजपने 96 उमेदवारांना दिले एबी फॉर्म

    महायुती तुटल्यानंतर तीन तासांत भाजपने 96 उमेदवारांना एबी फॉर्म म्हणजेच पक्षाच्या चिन्हावर अधिकृतरीत्या लढण्याची मुभा असलेले पत्र दिले. एकूण 50 माजी नगरसेवकांना भाजपने मैदानात उतरविले आहे. त्यात उबाठा व इतर पक्षांतून आलेल्या 13 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर 46 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. 19 ठिकाणी भाजपला उमेदवार मिळाले नाहीत तर मनपाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार भाजपने उतरविले आहेत.

     

  • 31 Dec 2025 08:09 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये चुरसीची लढत

    छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत विविध पक्ष आणि अपक्षांनी 29 प्रभागात 115 जागेसाठी दिवसभरात शहरातील नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत एक हजार आठशे सत्तर उमेदवारी अर्ज दाखल केले, आज दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. त्रुटी आढळल्यास उमेदवारी अर्ज बाद होतो का..? अशी धाक धुक आता उमेदवारांना पडली आहे.

  • 31 Dec 2025 08:08 AM (IST)

    आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अलर्ट मोडवर

    सांगली पोलिसांकडून 31 डिसेंबर आणि सांगली महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून स्वतः नाकाबंदीची तपासणी करण्यात येत आहे. शहरात ठीक ठिकाणी सांगली पोलीस दलाकडून नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक जिल्ह्यांमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळाले. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागेल. प्रचार शिगेला पोहोचला असून काही ठिकाणी युती म्हणून राजकीय पक्ष निवडणुका लढवत आहेत तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे. प्रशासकीय राजनंतर लोकप्रतिनिधींच्या हातात पालिकांचे कारभार जाणार आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात एकत्र उतरल्याने या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले. एबी फॉर्म मिळवण्यासाठी अनेकांची काल धडपड बघायला मिळाली. आता जोरदार प्रचारसभांचे आयोजन केले जाईल. यासह राज्यातील, देशविदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.