
गणपती, नवरात्रौत्सव, दसरा आणि दिवाळी असा सणांचा हंगाम सध्या सुरु आहे. मिठाईशिवाय कोणताही सण हा अपूर्ण समजला जातो. सणाच्या दिवशी पूजा आणि आनंदाच्या प्रसंगी मिठाईचं खास महत्त्व असते. पण, आजकाल बाजारात अनेक पदार्थांमध्ये भेसळ पाहायला मिळते.

मिठाईवर वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या फॉईल (वर्क) मध्ये भेसळ केलेली असते. अनेक मिठाईंवर विशेषतः काजू बर्फीवर चकाकीसाठी चांदीचा फॉईल वापरला जातो. मात्र, भेसळयुक्त आणि बनावट फॉइल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. खरा चांदीचा फॉइल ओळखणे फार कठीण असते. पण काही सोप्या आणि निवडक टीप्सने तुम्ही ही भेसळ ओळखू शकता.

खरा फॉइल हा अतिशय पातळ आणि चमकदार असतो. तो इतका पातळ बनवलेला असतो की तो हवेत सहज उडू शकतो. हा थोडा जाड, खडबडीत आणि जास्त चकाकणारा असतो. बनावट फॉईलमध्ये अॅल्युमिनियम सारखे धातू मिसळले जातात. जेणेकरुन तो अधिक चमकदार होईल.

खरा फॉईल खूप पातळ असल्याने, त्याला हाताने स्पर्श केल्यास तो सहजपणे तुटतो किंवा फाटतो. तो बोटांना चिकटतो. तर अॅल्युमिनियम मिश्रित फॉइल जाड आणि दाट असतो, त्यामुळे तो सहज फाटत नाही.

मिठाई खरेदी करताना नेहमी FSSAI प्रमाणित दुकानांमधूनच खरेदी करा. मोठे आणि प्रसिद्ध ब्रँड्स सामान्यतः खऱ्या चांदीच्या फॉइलचा वापर करतात आणि त्याची माहिती ते पॅकेजिंगवर नमूद करतात.

खऱ्या चांदीच्या फॉइलची किंमत थोडी जास्त असू शकते, तर बनावट फॉइल थोड्या कमी किमतीत मिळतो. भेसळयुक्त मावा आणि बनावट चांदीचा फॉइल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो, त्यामुळे मिठाई खरेदी करताना नेहमी गुणवत्ता आणि शुद्धता तपासा.