आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश

| Updated on: Sep 18, 2020 | 10:05 AM

मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्वात वरळीतील अनेक जणांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश
Follow us on

मुंबई : ठाकरे सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली आहे. कोणत्याही पक्षात नसलेले सर्वसामान्य नागरिक कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. (Aditya Thackeray Worli Constituency Voters enter MNS at Krishnakunja)

मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्वात अनेक जणांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. “वरळीतील एनजीओ, सार्वजनिक मंडळे यांचे कार्यकर्ते आणि काही सामान्य नागरिकांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.” अशी माहिती संतोष धुरी यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

“लोकप्रतिनिधी कसा असावा, तर लोकातला असावा. वरळी मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत निवडून दिलं होतं, पण काही महिन्यातच इथल्या मतदारांना त्यांच्या कामाची प्रचिती आली. सध्या कोणतीही निवडणूक नाही. परंतु राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा या नागरिकांनी व्यक्त करत मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे” असे धुरी यांनी सांगितले.

याआधी औरंगाबाद, मुंबई, पुणे अशा विविध भागात कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पाठोपाठ खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

खरं तर मनसेने वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली नव्हती. आदित्य ठाकरे रिंगणात उतरल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: हा निर्णय घेतला होता. ‘हे एक चांगलं जेश्चर आहे. आदित्य निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र आता वरळीतच मनसेमध्ये नवे कार्यकर्ते सामील होताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

चंद्रकांत खैरे यांना धक्का, औरंगाबादेतील सात निष्ठावंत शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

(Aditya Thackeray Worli Constituency Voters enter MNS at Krishnakunja)