एनडीएच्या बैठकीत शिवसेनेची कमतरता, लोजप नेते चिराग पासवान यांच्या भावना

| Updated on: Nov 18, 2019 | 12:13 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रलंबित बिलं आणि सरकारची भूमिका यावर चर्चा झाली.

एनडीएच्या बैठकीत शिवसेनेची कमतरता, लोजप नेते चिराग पासवान यांच्या भावना
Follow us on

नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची बैठक पार पडली. पहिल्यांदाच शिवसेनेशिवाय ही बैठक झाली. यावेळी लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी शिवसेनेची कमतरता जाणवत असल्याच्या भावना (Chirag Pasawan on Shivsena) व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रलंबित बिलं आणि सरकारची भूमिका यावर चर्चा झाली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे युवा नेते चिराग पासवान यांनी शिवसेनेची कमतरता जाणवत असल्याचं मत व्यक्त केलं. भविष्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मजबूत करण्यासाठी एक नवीन समिती स्थापन करुन चर्चा करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपचा झालेला काडीमोड पाहून लोक जनशक्ती पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एनडीएतून बाहेर न पडल्यामुळे चिराग पासवान बैठकीला हजर होते. बिहारमध्ये भाजप, लोजप आणि जदयू यांचं युतीचं सरकार आहे.

भाजपने शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकावर जागा देत एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत घोषणा केली.

अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची रवानगी पहिल्या रांगेतून तिसऱ्या रांगेत करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतर खासदारांनाही लवकरच नवीन जागा दिल्या जाणार आहेत. सावंत यांनी गेल्या आठवड्यात अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा देत सेना-भाजप युतीच्या फुटीचे संकेत दिले होते. त्यानंतर या मंत्रालयाचा अतिरिक्त भार प्रकाश जावडेकरांकडे सोपवण्यात आला.

शिवसेनेला ठेच, ‘लोजप’ शहाणा, चिराग पासवान यांचा भाजपला धक्का

शिवसेना एनडीएच्या बैठकांना हजर राहत नव्हती. त्यांचे मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना काँग्रेससोबत काम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनीच विरोधीपक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाशी सहमत आहे. म्हणूनच आम्ही शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधीबाकावर जागा दिली आहे, असं प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचं निमंत्रणच नव्हतं, मग शिवसेना एनडीएच्या बैठकीला जाण्याचा आगाऊपणा कसा करेल? असा प्रतिप्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला होता. (Chirag Pasawan on Shivsena)