AFG vs AUS : ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत, एकूण तिसरा सामना पावसाने जिंकला, अफगाणिस्तानचं समीकरण काय?
Afghanistan vs Australia Match Result : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील एकूण तिसरा आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे. अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे.

क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. मात्र या सामन्याचा पावसामुळे निकाल लागू शकला नाही. त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे यासह एकूण 4 गुण आले आणि त्यांनी उपांत्य फेरीत अधिकृत प्रवेश केला आहे. तर अफगाणिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान हे इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
सामन्यात काय झालं?
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 274 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि मॅथ्यू शॉर्ट या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. या दरम्यान अफगाणिस्तानने दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलं. मात्र अझमतुल्लाह याने मॅथ्यू शॉर्ट याला 20 धावावंर बाद करत ऑस्ट्रेलियाला 44 रन्सवर पहिला झटका दिला. त्यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ मैदानात आला. ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावल्यानंतर हेडने टॉप गिअरमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत अर्धशतक झळकावलं.
हेडच्या अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. ऑस्ट्रेलियाने 12.5 ओव्हरमध्ये 109 धावा केल्या. मात्र तेव्हा पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे हेड 59 आणि स्टीव्हन स्मिथ 19 धावांवर नाबाद परतले. त्यानंतर बराच वेळ पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र एका क्षणानंतर सामना रद्द झाला, असं जाहीर करण्यात आलं. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं.
पावसाने एकूण तिसरा सामना जिंकला
दरम्यान पावसाने या स्पर्धेतील सामना रद्द करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. या आधी 25 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तर 27 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला. या दोन्ही सामन्यात टॉसही होऊ शकला नाही.
कांगारुंची उपांत्य फेरीत धडक
Australia advance to the semis 🇦🇺#ChampionsTrophy #AFGvAUS ✍️: https://t.co/17Q04ho1qz pic.twitter.com/G0ZIFeTl78
— ICC (@ICC) February 28, 2025
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.
