अक्षय-रवीनासोबत जे खऱ्या आयुष्यात घडता घडता राहिलं, ते पडद्यावर पूर्ण होताच टाळ्यांचा कडकडाट

अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं अफेअर कोणापासून लपलेलं नाही. एकेकाळी हे दोघं एकमेकांशी लग्न करणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता तब्बल वीसएक वर्षांनंतर हे दोघं मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत.

अक्षय-रवीनासोबत जे खऱ्या आयुष्यात घडता घडता राहिलं, ते पडद्यावर पूर्ण होताच टाळ्यांचा कडकडाट
Akshay Kumar and Raveena Tandon
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 26, 2026 | 9:56 AM

नव्वदच्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत असलेली जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची. या दोघांचं अफेअर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत होतं. इतकंच नव्हे तर हे दोघं लग्नबंधनात अडकणार होते, असंही म्हटलं जातं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अक्षय आणि रवीना अनेकदा या चर्चांवर मोकळेपणे व्यक्तसुद्धा झाले आहेत. आता अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर असं काही पहायला मिळालं, जे अक्षय-रवीनाच्या खऱ्या आयुष्यात घडता घडता राहिलं होतं. ‘वेलकम टू द जंगल’ हा बहुचर्चित चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून यामध्ये हा सीन पहायला मिळाला. हा सीन पाहताच थिएटरमध्ये प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तर काहींनी जोरात शिट्ट्या वाजवल्या.

तब्बल वीस वर्षांनंतर अक्षय आणि रवीना ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक मोठा सरप्राइज मिळाला. एका सीनमध्ये जेव्हा रवीना आणि अक्षय एकमेकांसमोर येतात, तेव्हा ते सैन्यातील जवान बनतात. रवीना ज्या गावातली असते, त्याचं नाव आझादगंज असं असतं. तिथे दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातलेला असतो. त्यामुळे अक्षय आणि रवीना यांना सैन्याच्या वेशात पाहून गावकऱ्यांना वाटतं की ते त्यांना वाचवायला आले आहेत. गावकरी यांचं मोठ्या अधिकाऱ्यांप्रमाणे स्वागत करतात. तेव्हा रवीना तिच्या रक्ताने अक्षयच्या कपाळावर टिळा लावते.

पहा ट्रेलर-

अशा विचित्र क्षणी अक्षयला काय करावं ते सूचत नाही. तेव्हा तोसुद्धा चाकूने रवीनाच्या हातावर वार करून रक्ताने तिच्या कपाळावर टिळा लावतो. हा अजब सीन पाहून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो आणि सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करतात. चित्रपटाच्या याच सीनमध्ये रवीना अक्षयला विचारते, “वीस वर्षांपर्यंत तू कुठे होतास?” हाच सीन चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही पहायला मिळतो.

अक्षयसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर रवीनाने एका मुलाखतीत म्हटलं होतं, “ही काही मोठी गोष्ट नाही. अनेकांचे ब्रेकअप्स होतात, लोक आयुष्यात पुढे निघून जातात, कधीकधी त्यांच्यात चांगली मैत्रीही असते. पार्टनर म्हणून आम्ही एकमेकांसाठी चांगले नव्हतो पण मित्र म्हणून खूप चांगले आहोत, हे नंतर लक्षात येतं. यात कोणती मोठी गोष्ट आहे? मला हेच समजत नाही. मी पूर्णपणे ठीक होते. मीडियाने ते प्रकरण वाढवलं होतं. कारण त्याकाळी लोकांना मासिकांच्या खपण्याची चिंता असायची. माझे कुटुंबीय, जवळच्या मित्रमैत्रिणी काय विचार करतात, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं. एका ठराविक मर्यादेनंतर, लोक काय विचार करतात याने मला फरक पडत नाही.”

Follow Us