घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाचा पत्नी सुनितासोबत डान्स, केलं किस; युजर्स म्हणाले ‘सर्व दिखावा..’

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा हे घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. या चर्चांदरम्यान आता गोविंदा आणि सुनिता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाचा पत्नी सुनितासोबत डान्स, केलं किस; युजर्स म्हणाले सर्व दिखावा..
Govinda and Sunita Ahuja
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2025 | 12:57 PM

लग्नाच्या 37 वर्षांनंतर अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या संसारात मिठाचा खडा पडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सहा महिन्यांपूर्वीच सुनिताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. मात्र त्यानंतर दोघांनी त्यावर समाधान काढण्याचा प्रयत्न केला, असा खुलासा त्यांच्या वकिलाने केला आहे. यामुळे कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान गोविंदा आणि सुनिता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांसोबत बिनधास्त नाचताना आणि किस करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ‘मेरे प्यार का रस जरा चखना..’ या गाजलेल्या गाण्यावर गोविंदा आणि सुनिता थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला बरीच मंडळी उभी आहेत. हे पाहुणे गोविंदा आणि सुनिताकडे कौतुकाने पाहत आहेत. अशातच डान्सदरम्यान सुनिता गोविंदाला किस करते. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ‘या दोघांमध्ये सर्वकाही ठीक दिसतंय, मग घटस्फोटाचं नाटक कशासाठी’, असा सवाल एकाने केला. तर ‘नुसता दिखावा सुरू आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

पण या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य वेगळंच आहे. गोविंदा आणि सुनिताच्या डान्सचा हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे. डिसेंबर 2024 मध्ये गोविंदाने आपला 61 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी सुनिताने जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. याच पार्टीत दोघं पाहुण्यांसमोर मोकळेपणे थिरकले होते. तेव्हाचा हा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होत आहे.

दरम्यान घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनिताची प्रतिक्रिया समोर आली आहे. “कोई माई का लाल हमें अलग नहीं कर सकता (कोणीच आम्हाला वेगळं करू शकत नाही)”, असं ती म्हणाली. गोविंदा आणि सुनिताने 11 मार्च 1987 रोजी लग्न केलं होतं. या लग्नाबद्दल दोघांनी कोणालाच कानोकान खबर लागू दिली नव्हती. सुनिताने जेव्हा मुलीला जन्म दिला, तेव्हा त्यांच्या लग्नाच्या चर्चा पसरू लागल्या होत्या. करिअरच्या शिखरावर असताना गोविंदाने सुनिताशी लग्न केलं होतं.