इन्स्टावरील फॉलोअर्स कमी म्हणून मराठी अभिनेत्याला मालिकेतून काढलं? समोर आलं सत्य

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंगबद्दल त्याला आलेला एक अनुभव सांगितला. इन्स्टावरील फॉलोअर्स कमी होते, म्हणून त्याला मालिकेतून काढण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर आता अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

इन्स्टावरील फॉलोअर्स कमी म्हणून मराठी अभिनेत्याला मालिकेतून काढलं? समोर आलं सत्य
Sachin Deshpande
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 05, 2026 | 10:06 AM

सध्या सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सेलिब्रिटींसाठी तर हे प्लॅटफॉर्म खूपच महत्त्वाचं ठरतं. कारण हल्ली फॉलोअर्सच्या संख्येवरून त्यांना महत्त्व दिलं जात आहे. फॉलोअर्सचा हा आकडा फक्त लोकप्रियतेपुरता मर्यादित नसून त्याच्या आधारे एखाद्या कलाकाराला भूमिका दिली जात आहे किंवा थेट रिप्लेस केलं जात आहे. ‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेता सचिन देशपांडेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितलं होतं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स कमी असल्याने त्याला थेट रिप्लेस करण्यात आलं होतं, अशा चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर अखेर त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. सचिनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत नेमकं काय घडलं, त्याविषयी सांगितलं आहे.

या व्हिडीओत सचिन म्हणाला, “नुकत्याच एका मुलाखतीत मी कास्टिंगबद्दल मला आलेला अनुभव आणि माझी काही मतं मांडली होती. दोनएक महिन्यांपूर्वी मला आलेला अनुभवसुद्धा मी सांगितला होता. मला एका प्रॉडक्शन हाऊसकडून पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. त्यासाठी मी ऑडिशनसुद्धा दिलं होतं. मानधनाबद्दलही चर्चा झाली होती. सगळ्यात शेवटी त्यांनी माझा इन्स्टा आयडी मागितला. असं विचारतात हे मला माहीत होतं, पण माझ्यासोबत पहिल्यांदाच हे घडत होतं. त्यानंतर त्यांनी मला काहीच उत्तर दिलं नाही. दोन दिवसांनंतर मला समजलं की त्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्याला निवडलं गेलंय.

“हे इतकंच घडलं होतं. यात मला कुठेच असं सांगण्यात आलं नव्हतं की, चॅनलच्या वरिष्ठांना माझे फॉलोअर्स बघायचे आहेत, म्हणून आयडी मागितला किंवा फॉलोअर्स कमी आहेत म्हणून कास्टिंग झालं नाही. तरी अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, असं काहीच घडलं नाही. मला कुठल्याच मालिकेतून काढण्यात आलं नाही. मी आता ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेत काम करतोय. मालिकेतून काढणं आणि त्यासाठी निवडच न होणं.. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत”, असं त्याने पुढे स्पष्ट केलं.

सचिनचा व्हिडीओ-

सचिनच्या या स्पष्टीकरणावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सर तुम्ही म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे. परंतु अलीकडच्या काळात कास्टिंग डायरेक्टर कलाकाराचा अभिनय न बघता आधी त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट आणि फॉलोअर्स तपासतात,’ असं एकाने लिहिलं आहे. तर ‘इंडस्ट्रीमध्ये तंत्रज्ञान आणि ट्रेंड बदलले तरी अभिनयाचं स्थान फॉलोअर्स घेऊ शकत नाहीत. ही गोष्ट कास्टिंग टीमने लक्षात घ्यायला हवी,’ असं मत दुसऱ्या युजरने मांडलं आहे.

सचिनने ‘होणार सून मी या घरची’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘फॅमिली कट्टा’, ‘दुसरी गोष्ट’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us