Sohail Khan: सोहैल खान अचानक असा का दिसू लागला? गोळ्या की इंजेक्शनचा परिणाम? प्लास्टिक सर्जन म्हणाले..
Sohail Khan: अभिनेता सोहैल खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या लूकबद्दल चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. या फोटोमध्ये सोहैल खूपच वेगळा आणि वयस्कर दिसत असून त्याला नेमकं काय झालंय, असा सवाल नेटकरी करत आहेत.

खान भावंडांमध्ये अभिनेता सोहैल खान हा सलमान आणि अरबाजपेक्षा वयाने लहान आहे. तरी या दोघांपेक्षा तो अधिक वयस्कर दिसत आहे. ‘अलायन्स’ या शोमध्ये आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सोहैल खानला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. सोहैलला नेमकं झालंय तरी काय, तो असा का दिसतोय.. असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. काहींना हा ओझेम्पिक इफेक्ट असल्याचं म्हटलंय तर काहींनी स्टेरॉइड्समुळे त्याची अशी अवस्था झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. याबद्दल आता एका प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जनने वेगळीच बाजू मांडली आहे.
“सोहैल खान हा सलमान आणि अरबाज खान यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही तो अधिक वयस्कर का दिसतोय? हे खरंच ओझेम्पिक फेज आहे की आणखी काही.. प्लास्टिक सर्जन म्हणून याकडे मी जेनेटिक सायन्सच्या दृष्टीकोनातून कसं पाहतो, ते जाणून घेऊयात,” असं म्हणत प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. प्रशांत यादव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सोहैल खानचा फोटो व्हायरल-
What happened to sohail khan? 😭 pic.twitter.com/qYxyWEKY28
— Fahhh (@yowtfahhh) August 10, 2026
सोहैलच्या बदललेल्या लूकबद्दल त्यांनी सांगितलं, “हे खरं आहे की जेव्हा तुम्ही जलदगतीने वजन कमी करता तेव्हा चेहऱ्याचे नॅच्युरल डीप फॅट्स डिफ्लेट (कमी) होतात. यामुळे त्वचा सैल आणि चेहरा अचानक वयस्कर दिसू लागतो. यालाच लोक ओझेम्पिक फेज म्हणतात. पण सोहैल खानच्या बाबतीत वजन कमी होणं हे एकमेव कारण नाही. त्याचं बोन स्ट्रक्चर (हाडांची रचना) आणि मसल इलास्टिसिटी (स्नायूंची लवचिकता) त्याच्या दोन भावंडांपेक्षा खूप वेगळं आहे.”
“सलमान, अरबाजने एडव्हान्स फिलर्स, बोटॉक्स यांसारखे काही ट्रीटमेंट्स केले आहेत. तर चेहरा वयस्कर दिसू नये यासाठी त्यांनी हायफूसारख्या स्कीन टायटनिंग प्रोसिजरची मदत घेतली असेल. कोणत्याही प्रकारच्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे सोहैल खान असा दिसत नसून ही त्याची वैयक्तिक बायोलॉजिकल एजिंग प्रोसेस आहे. लिक्विड फेसलिफ्ट किंवा सर्जिकल टायटनिंगने हे बदललंही जाऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक बदलत्या चेहऱ्यामागे शॉर्टकट इंजेक्शन्स कारणीभूत असतात, असा निष्कर्ष काढू नये,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
अनेकांनी सोहैलच्या प्रकृतीविषयीही काळजी व्यक्त केली. परंतु ‘अलायन्स’ या शोमध्ये त्याने सिक्स पॅक अॅब्स दाखवले आणि 12 किलो वजन कमी केल्याचं भाऊ सलमानला सांगितलं होतं.