
स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात यांच्या बलात्कार आणि महिलांचे लैंगिक शोषण प्रकरण आता अधिक तीव्र झाले आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर होणाऱ्या टीकेला आज संभाजीराजे भोसले यांनी जोरदार साथ दिली आहे.
काय म्हणाले संभाजी राजे भोसले
संभाजीराजे भोसले यांनी कॅप्टन खरात प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर रूपाली चाकणकर स्वतःहून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्या ताबडतोब बडतर्फ कराव्यात.
संभाजीराजे पुढे म्हणाले, “कॅप्टन खरातच्या ट्रस्टवर रूपाली चाकणकर यांचा सहभाग असणे आणि त्यांची पाद्यपूजा करणे हे अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या व्यक्तीने अशा गुन्हेगाराच्या ट्रस्टशी संबंध ठेवणे आणि त्यांचा सन्मान करणे हे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे.”
मुख्यमंत्र्यांनी राजिनामा घ्यावा
त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन करताना सांगितले की, “हा केवळ नाशिकचा विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. कॅप्टन खरात प्रकरणाची स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखरेख करून उच्चस्तरीय चौकशी करावी. खरात प्रकरणात तत्काळ कठोर कारवाई व्हावी. महिला आयोगाच्या अध्यक्ष ट्रस्टच्या सदस्य आहेत, हे खूप गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने लक्ष घालून रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा सरकारला जबाबदार धरले जाईल.”
कॅप्टन अशोक खरात यांच्याविरुद्ध नाशिक, नाशिक ग्रामीण आणि शिर्डी या तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले यांची ही तीव्र प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. सध्या खरात यांना न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, SIT च्या तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.