
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी हजारो उमेदवार रिंगणात आहे. भाजपने प्रत्येक महानगर पालिकेत आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे आता लवकरच प्रचाराला सुरूवात होणार आहे. या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा गेमचेंजर ठरणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील काही दिवसांमध्ये अंदाजे 40 ते 45 सभा घेणार आहेत. प्रत्येक महानगरपालिकेसाठी फडणवीस सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मोठ्या महानगरपालिकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस अंदाजे तीन ते चार सभा घेणार आहेत, तर लहान महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक सभा घेतली जाणार आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या बड्या शहरांमध्ये दोनपेक्षा जास्त सभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या. आता महानगरपालिका निवडणुकीतही ते पायाला भिंगरी लावून प्रचार करणार आहे. ते दररोज 3-4 सभा घेण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार, 3 जानेवारीपासून महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 1 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढील 12-13 दिवसांमध्ये फडणवीसांसह इतर प्रमुख नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात निवडणूकीचे वातावरण असताना मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. अमरावती येथील चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. चिखलदरा येथील सुमारे साडेसात एकर जमीन पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आली होती. ही जमीन वापरात नव्हती. आता सरकार पर्यटन विकास महामंडळाकडून सुमारे तीन एकर जमीन संपादित करेल आणि ती श्री अंबादेवी संस्थेला मोफत देईल.